कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील खड्डे, दुरवस्था झालेले रस्ते सुस्थितीत करा. येत्या आठवडाभरामध्ये ही कामे पूर्ण करा, असे आदेश शहर अभियंता अर्जुन अहिरे यांनी प्रभागांमधील अभियंत्यांना दिले आहेत. यापुढील काळात खड्ड्यांविषयी एकही तक्रार, प्रवाशांची नाराजी होणार नाही याची काळजी घ्या, अशा सूचना अहिरे यांनी अभियंत्यांना दिल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- येऊरच्या जंगलात ३५० किलो कचरा

मागील दहा दिवसांपासून कल्याण, डोंबिवली, टिटवाळा भागात पालिका अभियंते रस्ते सुस्थितीत करण्यासाठी २४ तास काम करत आहेत. पालिका हद्दीतील बहुतांशी खड्डे पडलेल्या रस्त्यांचे डांबरीकरण पूर्ण झाले आहे. पहिले दुरवस्था झालेले रस्ते सुस्थितीत करा. तेथील खड्डे भरा. त्यानंतर नवीन प्रस्ताव, प्रलंबित रस्त्यांचे विषय मार्गी लावण्यासाठी प्रस्ताव सादर करा, अशा सूचना अहिरे यांनी अभियंत्यांना केल्या आहेत.

हेही वाचा- डोंबिवलीतील किल्ले बांधणी स्पर्धेत विवेकानंद सोसायटीचा विशाळगड ते पन्हाळा किल्ला प्रथम

गेल्या महिन्यात पदभार स्विकारल्यापासून शहर अभियंता अहिरे यांच्या समोर कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील खड्डे, दुरावस्था झालेले रस्त्यांची समस्या उभी होती. खड्ड्यांमुळे संतप्त झालेले नागरिक आंदोलन, थाळीनाद, उपोषण करुन प्रशासनाचा निषेध करत आहेत. गेल्या तीन महिन्यांपासून शहरातील रस्त्यांची दुरवस्था होऊनही माजी शहर अभियंता सपना कोळी यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मार्च ते मेपर्यंत त्या सातत्याने रजेवर जात होत्या. त्या रजेवर असल्याने खड्डे, रस्ते कामाच्या नस्ती लालफितीत अडकून पडत होत्या. प्रभागातून अभियंत्यांनी मे महिन्यापूर्वी खड्डे भरणीचे प्रस्ताव एप्रिल मध्ये पाठवुनही या प्रस्तावांवर माजी शहर अभियंता कोळी यांनी जून अखेरपर्यंत निर्णय घेतले नव्हते, असे अभियंते आता सांगतात. प्रभागातील अभियंत्यांनी पाठविलेल्या नस्ती दाबून ठेवण्याची कामे शहर अभियंता कोळी यांनी केली. त्याचे चटके खड्ड्यांच्या माध्यमातून प्रवाशांना बसले, असे पालिका अभियंते सांगतात.

हेही वाचा- डोंबिवली शिवसेना मध्यवर्ति शाखा शिंदेंच्या ताब्यात ; शिंदे समर्थकांनी खरेदी केली शिवसेना शाखेची जागा

डोंबिवलीतील रस्ते सुस्थितीत

गेल्या महिन्यात पदभार स्वीकारल्या पासून खड्डे, रस्ते दुरवस्थेवरुन धुरळा उडाल्याने आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी शहर अभियंता विभागाला दिवाळीपूर्वी शहरांमधील सर्व रस्ते सुस्थितीत करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाप्रमाणे डोंबिवली विभागाच्या बांधकाम कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे यांनी डोंबिवली शहरासह लगतच्या २७ गाव भागांमधील बहुतांशी रस्त्याची खड्डे भरणी, सुस्थितीत करण्याची कामे पूर्ण केली आहेत. काही रस्त्यांचे वरचे थर काढून त्याच्यावर नवीन खडीकरण, डांबरीकरण केले जाणार आहे. तर काही रस्ते काँक्रिटीकरणाचे प्रस्तावित आहेत, असे कार्यकारी अभियंता लोकरे यांनी सांगितले. डोंबिवलीतील सर्व रस्त्यांवरील डांबरीकरणाची कामे पूर्ण केली आहेत. काही अंतर्गत रस्त्यांवरील कामे हाती घेण्यात येत आहेत. दिवसा खड्डे भरणीची कामे केली तर वाहतुकीला अडथळा येतो. त्यामुळे रात्री १० ते पहाटे पाच वाजेपर्यंत गेल्या १५ दिवसांपासून कामे पूर्ण केली जात आहेत, असे लोकरे यांनी सांगितले. कल्याण मध्ये कार्यकारी अभियंता जगदीश कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली खड्डे भरणीची कामे सुरू आहेत. सर्वाधिक वर्दळीच्या गोविंदवाडी रस्त्यावरील खड्डे भरणाची कामे पूर्ण करण्यात आल्याने प्रवासी समाधान व्यक्त करत आहेत.

लगेच खोदाई नको

मागील तीन महिन्यांपासून खड्ड्यांमुळे हैराण झालेल्या प्रवाशांनी पालिकेने आता तात्काळ रस्ते खोदून सेवा वाहिन्या टाकणाऱ्या महानगर गॅस, दूरसंचार, महावितरण व इतर खासगी कंपन्यांना परवानगी देऊन नये. या कंपन्या रस्ते खोदून कामे करतात. चार महिन्यानंतर शहरातील रस्ते सुस्थितीत झाले आहेत. आता चांगल्या रस्त्यांचा अनुभव प्रवाशांना घेऊन द्या, अशी मागणी नोकरदार वर्गाकडून केली जात आहे. या कंपन्यांना दोन ते तीन महिन्यांनी कामे करण्याची मुभा द्यावी, अशी प्रवाशांची मागणी आहे.

हेही वाचा- डोंबिवलीत बेकायदा इमारतीवरील गच्चीवरील बांधकामाला अधिकाऱ्यांचा आशीर्वाद?

अधिकाऱ्यांवर दबाव

अनेक खासगी कंपन्या मंत्रालयातून पालिका अधिकाऱ्यांवर दबाव आणून रस्ते खोदाईसाठी परवानगी मिळवितात. या कंपन्यांनी पालिकेकडे खोदाईचे शुल्क भरणा केले असले तरी या कंपन्यांची कामे संथगतीने होत असल्याने वाहतूक कोंडीच्या समस्येला प्रवाशांना सामोरे जावे लागते. पालिकेत आता पाच ते सहा खासगी कंपन्यांचे रस्ते खोदाईचे प्रस्ताव येऊन पडले आहे, अशी माहिती आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Improve potholes dilapidated roads in kalyan dombivli municipality limits city engineer arjun ahire has given orders to the engineers thane dpj
Show comments