निखिल अहिरे
ठाणे : करोनाकाळातील ऑनलाइन शिक्षणामुळे जिल्ह्यातील पहिली ते तिसरीपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अक्षर ओळख आणि संख्या आकलन क्षमतेमध्ये कमालीची घट झाल्याची चिंताजनक बाब एका सर्वेक्षण अहवालातून समोर आली होती. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संस्थांच्या वतीने मुलांच्या या गुणवत्ता दरात वाढ करण्यासाठी मागील तीन महिन्यात विविध उपक्रम राबविण्यात आले. याच उपक्रमांचे फलित म्हणून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता दरात कमालीची वाढ झाल्याची सकारात्मक बाब समोर आली आहे.
तीन महिन्यांपूर्वी अक्षर ओळख नसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या २२.७९ टक्के इतकी होती. यात घट होऊन ही आता ४.०८ टक्के इतकी आहे. तर अंक ओळख नसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १८.१९ टक्के इतकी होती. यात घट होऊन ही संख्या आता २.२९ टक्के इतकी झाली आहे. शासनाने करोनाकाळात ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय स्वीकारला होता. या ऑनलाइन शिक्षणाचा सर्वाधिक फटका हा पहिली ते चौथीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बसला. या इयत्तांमध्ये प्रामुख्याने अक्षर, अंक ओळख तसेच अक्षर वाचन यांसारख्या गोष्टींतून शिक्षणाचा पाया रचला जातो.
ऑनलाइन शिक्षणातून यांसारख्या गोष्टी विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात शिकता न आल्याने त्यांच्या गुणवत्ता दरावर काय परिणाम झाला आहे यासाठी जिल्हा प्रशासनाने एक सर्वेक्षण मोहीम राबविली होती. यात विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता दरावर मोठा परिणाम झाल्याचे दिसून आले होते. हा दर सुधारण्यासाठी जिल्हा परिषद, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था राहटोली आणि सिखे संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मागील तीन महिन्याच्या कालावधीत उमंग अभियान राबविण्यात आले होते. या अंतर्गत जिल्ह्यातील १,३२८ शाळांतील पहिले ते तिसरीत शिकणाऱ्या ३८ हजार २४ विद्यार्थ्यांच्या अक्षर, अंक ओळख तसेच अक्षर वाचन याच्या विविध चाचण्या घेण्यात आल्या होत्या. यामध्ये अक्षर ओळख येत नसलेली विद्यार्थी संख्या २२.७९ टक्के इतकी होती. अभियानानंतर लक्षणीय घट होऊन अक्षर ओळख येत नसलेली विद्यार्थी संख्या आता ४.०८ टक्के आहे.
शब्द वाचन करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही २८.४५ टक्क्यांवरून ५१.१६ टक्के विद्यार्थी परिच्छेद आणि गोष्ट वाचन करू लागले आहेत. तसेच ० ते ९ संख्याज्ञान असणारे विद्यार्थी संख्या ३८.६० टक्के, ९९ पर्यंत संख्याज्ञान असणारे २५.५२ इतकी होती. संख्याज्ञान असलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होऊन ही संख्या सध्या ७०.६७ इतकी झाली आहे. तसेच यातील बहुसंख्य विद्यार्थी बिनहातच्याची बेरीज आणि वजबाकी करू लागली आहे. यामुळे जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता दरात वाढ होत असल्याचे सकारात्मक चित्र दिसत आहे.
उमंग अंतर्गत राबविलेले उपक्रम
विद्यार्थ्यांना विविध गोष्टींच्या आधारे भाषेची तसेच शब्दांची ओळख करून देण्यात आली. तसेच शाळेत विद्यार्थ्यांकडून नियमितपणे पाठांतर तसेच जोडशब्दांचे वाचन करून घेण्यात आले. मनोरंजनात्मक उपक्रमांद्वारे अक्षरांची ओळख करून देण्यात आली. विविध संख्यांच्या आकृती तसेच चित्रांद्वारे विद्यार्थ्यांना गणिताची ओळख करून देण्यात आली. खेळीमेळीच्या वातावरणात आणि मनोरंजक पद्धतीने विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण दिल्याने त्यांच्या गुणवत्ता दरात वाढ झाली आहे. यामध्ये संस्थेचे स्वयंसेवक तसेच सर्व शाळांचे शिक्षकवर्ग आणि जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी यांनी मोलाची भूमिका बजावली.
गुणवत्ता दर सुधारण्यासाठी मागील तीन महिने उमंग अभियान राबविण्यात आले होते. यामुळे विद्यार्थ्यांचा गुणवत्ता दर सुधारण्यास मोठी मदत झाली आहे. तसेच येत्या शैक्षणिक वर्षांत विद्यार्थ्यांची भाषा व गणितातील गतिमानता वाढण्यास या प्रशिक्षणाचा निश्चित उपयोग होईल.
– डॉ.भरत पवार, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था रहाटोली, जिल्हा ठाणे</p>