वाचन संस्कृती टिकवण्यासाठी ग्रंथालये उभी राहतात. अनेक वेगवेगळ्या पुस्तकांचा, ग्रंथांचा संग्रह त्या ग्रंथालयात होत असतो. याचा उपयोग अर्थातच वाचनप्रेमींना होत असतो. ग्रंथांचे जतन हे ग्रंथालयाचे उद्दिष्ट असले तरी काळानुरूप जास्तीत जास्त साहित्यनिर्मिती करणे हा मुद्दाही तितकाच महत्त्वाचा ठरतो. साहित्याची निर्मिती ही केवळ वैयक्तिक पातळीवर होऊन चालणार नाही. ग्रंथालयांनी ग्रंथांच्या संग्रहासोबत दर्जेदार साहित्याची निर्मिती केली तर ग्रंथालयाच्या माध्यमातून भविष्यात मोठय़ा प्रमाणात ग्रंथसंपदेचा प्रसार होईल. वाचन संस्कृतीचे हेच उद्दिष्ट ठेवून बदलापूरमधील आदर्श महाविद्यालयाच्या ग्रंथालयाने ग्रंथसंग्रहासोबत साहित्याची निर्मिती करत आपले वेगळेपण जपले आहे. निसर्गाच्या सान्निध्यात असलेले आदर्श महविद्यालय आणि महाविद्यालयातील ग्रंथालयात असणारी ग्रंथसंपदा पाहिली की खरोखरच विद्येच्या मंदिरात आल्याचे समाधान मिळते. ग्रंथालयात प्रवेश केल्यावर भिंतींवर असणारी संस्कृत सुभाषिते जगण्याचे धडे देतातच पण त्याचसोबत महाविद्यालयीन जीवनात संस्कृत भाषेशी फारसा संबंध येत नसणाऱ्या विद्यार्थ्यांना दररोज ग्रंथालयात आल्यावर संस्कृत भाषेशी दृश्यात्मक परिचय होत असतो. ग्रंथालयाच्या एका भिंतीवर एकाग्रता, काम, भविष्य, चारित्र्य या विषयावर स्वामी विवेकानंदांनी सांगितलेल्या मार्गदर्शनपर ओळी आणि त्यांचे छायाचित्र लावण्यात आली आहेत. ग्रंथालयातच विद्यार्थ्यांसाठी प्रशस्त अभ्यासिका आहे. महाविद्यालयाच्या वेळेत विद्यार्थी अभ्यासिकेचा लाभ घेत असतात. ग्रंथालयात सध्या २० हजार ८३६ ग्रंथसंपदा आहेत. ग्रंथांसोबत ८५ नियतकालिके, २५१ अभ्यासक्रमाच्या सीडी आणि २७ नकाशे विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. काळानुसार प्रगती करीत महाविद्यालयाच्या ग्रंथालयात ई माध्यम म्हणून ई जर्नल्स, ई बुक्सची सुविधा विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे. दुर्मीळ पुस्तकांचा संग्रह, अनेक जुन्या-नव्या पुस्तकांचा भरणा असलेल्या या ग्रंथालयात तितकीच दुर्मीळ पुस्तकेही अभ्यासायला मिळतात. श्रीधर केतकर यांचे महाराष्ट्रीय ज्ञानकोश, वि. भा. देशपांडे यांचे मराठी नाटय़कोश, संख्यासंकेत कोश, सिद्धेश्वर शास्त्री यांचे प्राचीन भारतीय स्थलकोश ही खूप जुनी पण तितकीच आजच्या काळातही वाचनमूल्य असणारी पुस्तके ग्रंथालयात उपलब्ध आहेत. सोळा भाषांमध्ये एका शब्दाचा अर्थ सांगणारे प्रा. नरवणे यांचे १९५८ चे प्रकाशन असलेले ‘भारतीय व्यवहार कोश’ हे अतिशय दुर्मीळ पुस्तक ग्रंथालयाच्या संग्रही आहे. ग्रंथालयातील या पुस्तकांचा विद्यार्थ्यांना उपयोग होतोच पण त्याचबरोबर प्राध्यापकांनाही आपल्या संशोधनासाठी इथल्या पुस्तकांचा उपयोग होत असतो. या ग्रंथालयाचे वैशिष्टय़ म्हणजे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत बाहेरील विद्यार्थ्यांना किंवा संशोधन करत असणाऱ्या व्यक्तींनाही या ग्रंथालयातील पुस्तकांचा लाभ घेता येतो. ग्रंथालयात ओपॅक प्रणाली आहे. ज्याच्या आधारे विद्यार्थी त्यांना हव्या असणाऱ्या पुस्तकाचा शोध घेऊ शकतात. विद्यार्थ्यांना लागणाऱ्या प्रश्नपत्रिका वेळीच उपलब्ध नसतील तर त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून त्वरित विद्यार्थ्यांना त्यांच्या मेल अकाउंटवर ग्रंथालयातर्फे पाठवण्यात येतात. विद्यार्थ्यांकडून साहित्यनिर्मिती तसेच विद्यार्थ्यांवर वाचनाबरोबरच लेखन संस्कारही व्हावेत म्हणून ग्रंथालयाच्या माध्यमातून महाविद्यालयाच्या वतीने विविध विषयांवरील अंक वेळोवेळी प्रकाशित केले जातात. त्यात वेगवेगळ्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांकडून एखादी संकल्पना घेऊन दरवर्षी लिहून घेतले जाते. महाविद्यालयातर्फे दरवर्षी ‘सृजन’ हा अंक प्रकाशित केला जातो. मराठी विभागाचे अस्मिता, एन.एस.एस. विभागाचे उमंग, इतिहास विभागाचे अश्वमेध अशा वेगवेगळ्या विभागांतील अंकात विद्यार्थ्यांचे लेख, चित्रे प्रदर्शित केली जातात. महाविद्यालयातील प्राध्यापकांनी वेळोवेळी सादर केलेले संशोधन पेपर संग्रह स्वरूपात ग्रंथालयात आहेत. पुस्तक परीक्षण, पुस्तक प्रदर्शन, वृत्तपत्रातील लेखावर चर्चा असे वेगवेगळे उपक्रम ग्रंथालयातर्फे विद्यार्थ्यांसाठी घेतले जातात. यात सर्वात विशेष म्हणजे केवळ अनुदानित अभ्यासक्रमाला दिली जाणारी बुक बँक ही योजना येथे विनाअनुदानित अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनाही दिली जाते, असे प्राचार्या डॉ. वैदेही दप्तरदार यांनी सांगितले.

या ग्रंथालयात केवळ ग्रंथसंपदा नाही तर आपुलकीने बांधले जाणारे नाते आहे. त्यामुळेच इथला वाचक वर्ग आणि कर्मचारी वर्ग हे आपले ग्रंथालय आहे या भावनेने येत असतो. वाचनाबरोबरीनेच विद्यार्थ्यांकडून साहित्यनिर्मिती व्हावी यासाठी महाविद्यालयातर्फे अंक प्रकाशित केला जातो.
डॉ. वैदेही दप्तरदार,प्राचार्या, आदर्श महाविद्यालय.

 

 

Story img Loader