‘तलावांचे शहर’ असे बिरुद मोठय़ा अभिमानाने मिरविणाऱ्या ठाणे शहरातील तलावांची अस्वच्छता वाढत चालली असून याकडे महापालिका प्रशासनाचे बिलकूल लक्ष नाही. शहराची शान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मासुंदा तलाव म्हणजेच तलावपाळीवर दुरवस्थेचीच ‘पाळी’ आली आहे. या तलावात शेवाळ साचू लागले असून काठावर उंदीर, घुशींचे साम्राज्य निर्माण झाले आहे. ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पात शहरातील सर्वच तलावांचे जतन, संवर्धन आणि सुशोभीकरणासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. तलावांच्या सुशोभीकरणासाठी काही कोटी रुपयांच्या निविदाही काढण्यात आल्या आहेत. असे असताना शहराच्या मध्यवर्ती भागात असलेला मासुंदा तलाव मात्र उपेक्षित राहिल्याचे चित्र आहे.  
महापालिकेची योजना
ठाण्यातील या तलावांचे अस्तिव अबाधित ठेवण्यासाठी महापालिकेने ‘एकात्मिक तलाव सौंदर्यीकरण योजना’ हाती घेतली. त्यासाठी अर्थसंकल्पात आठ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शहरातील कचराळी, ब्रह्माळा, शिवाजीनगर, खारेगाव आणि हरिओमनगर भागातील तलावांच्या सुशोभीकरणाचे काम आखण्यात आले असून त्यासाठी ६५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या तलावातील गाळ काढणे, पाण्याचे शुद्धीकरण करणे अशा स्वरूपाच्या कामांचा त्यामध्ये समावेश करण्यात आला आहे.
घाणीचे साम्राज्य
* मासुंदा तलावातील पाणी दूषित झाले आहे.
* तलावामध्ये निर्माल्य टाकण्यासाठी बंदी घातलेली आहे. मात्र हा नियम काही रहिवाशांकडून सरसकटपणे मोडला जात आहे.
* रहिवाशांकडून सातत्याने घाण टाकली जात असल्याने तलावाच्या पाण्याला हिरवा तवंग आला असून काठावर घाण साचली आहे.
* तलावात घाण टाकू नये म्हणून येथे काही सुरक्षा रक्षक नेमले. पण त्यांचे प्रयत्नही अपुरे ठरले आहेत.
* तलावाच्या काठावर उंदीर, घुशींचे प्रमाण वाढले असून त्यास अटकाव करण्याचे कोणतेही प्रयत्न महापालिकेकडून होताना दिसत नाही.
* तलावाकाठी असलेल्या कट्टयावर बसणाऱ्यांकडून खाण्याचे पदार्थ, कचरा तेथेच टाकला जातो. त्यामुळे घुशी वाढल्याचे सांगण्यात येते.
* या तलावासंबंधीच्या तक्रारी काही जागरूक नागरिकांनी महापालिकेकडे केल्या. मात्र त्यास दाद दिली गेली नाही.

Story img Loader