डोंबिवली : डोंबिवली जवळील आगासन गाव हद्दीत रविवारी रात्री दुचाकी वरुन जात असताना एका तरुणाचा खड्डे चुकवित असताना तोल गेला आणि त्याचवेळी समोरुन येत असलेल्या पाण्याच्या टँकर खाली चिरडून जागीच मृत्यू झाला. घटना घडताच टँकर चालक पळून गेला. या घटनेने दिवा, आगासन परिसरातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

या दुर्घटनेबद्दल कल्याण ग्रामीणचे स्थानिक आमदार प्रमोद पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आ. पाटील यांनी सांगितले, ठाण्यासाठी मोठ्या निधीच्या घोषणा होत आहेत. विकास कामांची चंगळ या भागात सुरू होणार आहे. मग ठाण्यात दिवा असुन, मुख्यमंत्री ठाण्याचे असुन दिवा गाव परिसरावर विकास कामांच्या बाबतीत अन्याय का, असा प्रश्न करत आ. पाटील यांनी खड्ड्यांमुळे असे किती बळी घेतले जाणार आहेत. ते तरी अगोदर सरकारने जाहीर करावे. विकास कामांच्या फक्त कागदावर घोषणा केल्या जातात. त्याचे श्रेय घेण्यासाठी मोठाले फलक लावून नागरिकांना भुलविले जाते. आणि ती कामे मग किती मार्गी लागली याचा कोणताही आढावा आणि पाठपुरावा नंतर घेतला जात नाही. त्यामधून असे बळी जातात, अशी टीका आ. प्रमोद पाटील यांनी केली.

हेही वाचा… वातानुकूलित लोकल फेऱ्यांविरोधात प्रवासी पुन्हा आक्रमक ; कळव्यातील बैठकीत आंदोलनाचा निर्धार

दिवा, आगासन, भोपर, घारीवली परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. सर्वाधिक वर्दळीचे हे रस्ते असुनही त्याकडे कोणीही लक्ष देत नाही, अशी माहिती या भागातील ग्रामस्थांनी दिली.

तरुणाचा मृत्यू

गणेश विठ्ठल फले (२२, रा. ग्लोबल इंग्लिश स्कूळ जवळ, ओमकार नगर, आगासन रोड, दिवा) हा तरुण ज्युपिटर दुचाकी वरुन आगासन रस्त्यावरुन दिवा येथे रविवारी रात्री आठ वाजता चालला होता. आगासन-दिवा रस्त्याची खड्ड्यामुळे चाळ झाली आहे. या रस्त्यावर पथदिवे नसल्याने दुचाकीच्या दिव्यांच्या प्रकाश झोतात खड्डे चुकवत गणेश फले एकटाच चालला होता. एक मोठा खड्डा चुकवित असताना गणेशचा दुचाकीवरचा ताबा सुटला आणि तोल जाऊन तो पडत असताना बाजुने एक पाण्याचा टँकर चालला होता. त्या टँकरखाली गणेश पडताना सापडला. चाक अंगावरुन गेल्याने गणेशचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा… Maharashtra News Live Updates : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर…

घटना घडल्यानंतर टँकरचा चालक (एमएच ४३ यु २४१४) फरार झाला. बराच उशीर गणेशचा मृतदेह घटनास्थळी पडून होता. आ. प्रमोद पाटील यांनी रात्री ही माहिती ठाणे आपतकालीन पथकाला दिली. तोपर्यंत आगासन गावातील ग्रामस्थांनी तातडीने हालचाल करुन गणेशचा मृतदेह कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयात नेला. तेथे त्याची तपासणी करुन डाॅक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच मुंब्रा पोलीस घटनास्थळी आले. फरार टँकर चालक आणि टँकरच्या मालकाचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.

या घटना टाळण्यासाठी गगनचुंबी भागातील रस्ते कराच पण अशा गाव भागातील रस्त्यांना प्राधान्य द्या अशी मागणी आ. प्रमोद पाटील यांनी केली आहे.

Story img Loader