अंबरनाथ: अंबरनाथमधील शिलाहार काळातील उत्कृष्ठ स्थापत्य कलेचा नमुना असलेल्या शिवमंदिराच्या शिल्पांची झिज होत असून त्यावरील शिल्प निखळल्याचा प्रकार समोर आला आहे. ज्येष्ठ प्राच्यविद्या अभ्यासक डॉ. कुमुद कानिटकर यांनी नुकतीच मंदिराला दिलेल्या भेटीदरम्यान ही बाब समोर आली. त्यांनी याबाबत समाजमाध्यमांवर नाराजी व्यक्त केली. त्यानंतर भारतीय पुरातत्व विभागाने मंदिर परिसरात धाव घेत काही पाहणी केली आणि काही गोष्टी बंद करण्याचे सांगितले आहे. मंदिरात आणि परिसरात सुरू असलेल्या काही गोष्टींवर डॉ. कानिटकर यांनी यापूर्वीच नाराजी व्यक्त केली होती.
सुमारे एक हजार वर्ष जुने असलेले अंबरनाथचे शिवमंदिर स्थापत्य कलेचा उत्कृष्ठ नमुना म्हणून अभ्यासकांना खुणावत असते. येथील शिल्प, त्यावरचे संदर्भ इतिहास अभ्यासकांसाठी पर्वणीच असते. डॉ. कुमुद कानिटकर यांनी २५ वर्षे यावर अभ्यास करत मंदिराचे स्थापत्य वैशिष्ट्ये जगासमोर आणली. त्यांच्या अभ्यासात या मंदिरातील शिल्पांना नियमीत पुजाविधी आणि उपक्रमांमुळे धोका पोहोचत असल्याचे त्यांनी यापूर्वीच सांगितले होते. त्यानंतर मंदिराच्या आवारात ध्वनिक्षेपण यंत्रणा, वास्तूवरील शिल्पांवर तसेच मुर्तींवर होणारा दुग्धाभिषेक, नारळ फोडणे आणि होमहवन असे प्रकार सुरूच राहिले.
हेही वाचा : शिवीगाळ केल्याने तरूणाची मित्रांकडून हत्या; अल्पवयीन मुलगा ताब्यात, तर इतर दोघांचा शोध सुरू
नुकतेच तामिळनाडू येथील काही पर्यटक अंबरनाथ येथे हे मंदिर पाहण्यासाठी आले होते. डॉ. कुमुद कानिटकर या त्यांना मंदिराबाबत मार्गदर्शन करत होत्या. या पाहणीवेळी मंदिराच्या मागच्या बाजुला असलेली लिंगोद्भव शिल्पाशेजारी असलेली विष्णुची मुर्ती तिथे नसल्याचे त्यांना दिसून आले. येथे अंतराळाच्या उजव्या खांबावर असलेली सूर्यमूर्ती येथे नाही. हे शिल्प निखळून त्याचा तुटलेला भाग शेजारी ठेवण्यात आल्याचे डॉ. कुमुद कानिटकर यांनी सांगितले. तसेच मंदिरातील काही शिल्पांचीही मोठ्या प्रमाणात झिज झाल्याचे समोर आले आहे. याची माहिती समाजमाध्यमातून दिल्यानंतर मध्यरात्रीच पुरातत्व विभागाचे अधिकाऱ्यांनी मंदिरात धाव घेत उपाययोजनांना सुरूवात केली. मात्र मंदिराच्या वास्तूलाही धोका निर्माण होत असल्याचा दावा केला जातो आहे.
हेही वाचा :डोंबिवलीत भंगाराच्या गोदामाला भीषण आग
“ही बाब निदर्शनास आल्यानंतर तातडीने धाव घेत येथे काही गोष्टींवर निर्बंध घालण्यात आले आहे. ध्वनीक्षेपक, दुग्धाभिषेक, नारळ फोडणे अशा गोष्टी रोखणे आवश्यक आहेत. नियमीत स्वच्छतेचेही आदेश देण्यात आले आहेत. लवकरच येथील संरचना संरक्षित करण्यासाठी उपाययोजना केल्या जातील”, असे भारतीय पुरातत्व विभागाचे पुरातत्व अधिकारी कैलास शिंदे यांनी म्हटले आहे. “शिवमंदिराचे वैभव टिकवण्यासाठी सर्व विभागांची बैठक बोलावून त्यात काही गोष्टी ठरवण्याची गरज आहे. त्या गोष्टींचे पालन होणे आवश्यक आहे”, असे मत डॉ. कुमुद कानिटकर (प्राच्यविद्या संशोधक, मुंबई) यांनी व्यक्त केले.