अंबरनाथ : अंबरनाथ पूर्वेतील नवरे नगर परिसरात असलेल्या श्री सरस्वती देवी इमारत क्रमांक पाचमधील चौथ्या मजल्याचा स्लॅब कोसळून दुसऱ्या मजल्यावर आल्याची घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली. यात दुसऱ्या मजल्यावर असलेली दोन मुले जखमी झाली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. यात सर्व घरांमध्ये कुटुंबे राहत होत होती. यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या घटनेने अंबरनाथ शहरात एकच खळबळ उडाली.
श्री सरस्वती देवी बिल्डींग क्रमांक पाचमध्ये हा अपघात झाला. ही तळमजला अधिक चार मजल्याची इमारत आहे. ही इमारत नेमकी कधी उभी राहिली याबाबत नेमकी माहिती उपलब्ध झाली नाही. मात्र दुपारच्या सुमारास चौथ्या मजल्यावरील घराच्या बेडरूमचा भाग दुसऱ्या मजल्यावर येऊन पडला. यावेळी सुदैवाने चौथ्या आणि तिसऱ्या मजल्यावरील बेडरूममध्ये कुणीही नव्हते. मात्र दुसऱ्या मजल्यावर असलेल्या घरातील बेडरूममध्ये दोन मुले होती. ही दोन मुले या घटनेत जखमी झाल्याची माहिती अंबरनाथ नगरपालिकेच्या अग्नीशमन दलाचे भागवत सोनोने यांनी दिली आहे. त्यांच्यावर उल्हासनगरच्या रूग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहितीही सोनोने यांनी दिली आहे. येथील सर्व रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून इमारत रिकाम करण्यात आल्याचेही सोनोने यांनी सांगितले आहे.
शेजारच्या उल्हासनगर शहरात याप्रकारचे अनेक अपघात गेल्या काही वर्षात समोर आले आहे. ज्यामध्ये निकृष्ट दर्जाचे बांधकाम साहित्य वापरल्याने अशा घटना घडलेल्या आहेत. तसेच काही वर्षांपूर्वी उल्हासनगर शहरात अनधिकृत बांधकाम कारवाईत स्लॅब तोडण्यात आले होते. मात्र काही बांधकाम व्यावसायिकांनी पुन्हा ते स्लॅब जोडून त्याचा वापर सुरू केला होता. या घरांचेही स्लॅब कोसळल्याचेही दिसून आले होते. यापैकी कोणत्या कारणामुळे स्लॅब कोसळला याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. मात्र या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.