अंबरनाथ: हिंदूंची वहिवाट हीच मलंग मुक्तीची पहाट अशी घोषणा करत काही दशकांपूर्वी शिवसेनेचे आनंद दिघे यांनी सुरू केलेला मलंग उत्सव येत्या माघ पौर्णिमेला १२ फेब्रुवारी रोजी होणार आहे. यानिमित्त शिवसेनेच्या दोन्ही गटांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. दोन्ही गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी नुकत्याच याबाबत बैठका घेत भाविकांना आणि समर्थकांना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

अंबरनाथ तालुक्यातील मलंग गड हा गेल्या काही वर्षात कायमच वादाचा आणि अस्मितेचा मुद्दा राहिला आहे. येथे हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही धर्माच्या अनुयायांकडून पूजा केली जाते. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आनंद दिघे यांनी हिंदूची वहिवाट हीच मलंग मुक्तीची पहाट अशी घोषणा दिली होती. त्यानंतर दरवर्षी माघ पौर्णिमेला मलंग गडावर जात आरती केली जाते. यंदाही १२ फेब्रुवारी रोजी येथे आरती केली जाणार आहे. शिवसेनेच्या फुटी नंतर येथे शिवसेनेचे दोन्ही गट सक्रिय असतात. या मुद्द्यावर दोघांचे एकमत आहे. येत्या १२ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या उत्सवासाठी दोन्ही गटांनी जय्यत तयारी केली आहे. दोन्ही गटांनी येथे भाविकांना मोठ्या संख्येने येण्याचे आवाहन केले आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी येथे मलंग गडाच्या पायथ्याशी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने येथे भव्य हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः मलंग गडाच्या बाबतीत तुमच्या मनात असलेला निर्णय होईल, असे सांगत मलंग मुक्तीची घोषणा केली होती. मात्र त्यावर ठोस निर्णय होऊ शकलेला नाही. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या भागात विविध विकासकामे करण्यावर भर दिला आहे. याच भागात काही वर्षांपूर्वी हिंदू धर्मा सभा आयोजित करण्यात आली होती. आजही शिंदे आणि त्यांचे पदाधिकारी तसेच शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी येथे सक्रियपणे असतात. आता येत्या १२ फेब्रुवारी रोजी मलंग गडावर आरती केली जाणार असून त्यासाठी एकनाथ शिंदे येण्याची शक्यता आहे. सध्या पोलीस आणि महसूल प्रशासन येथे विविध तयारी करण्यात व्यस्त आहे.

Story img Loader