कल्याण : कुटुंबीयांसमवेत राहत असलेल्या एका मुलावर गेल्या महिन्यात अंबरनाथमध्ये चार अल्पवयीन मुलांनी सामुहिक लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. पीडित मुलाच्या आईने याप्रकरणी उशिरा अंबरनाथ येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात रविवारी तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी चार अल्पवयीन मुलांच्या विरोधात पीडित मुलाच्या आईच्या तक्रारीवरून बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि माहिती व तंत्रज्ञान अधिनियमाने रविवारी गुन्हा दाखल केला आहे. १३ ते १५ वयोगटातील गुन्हा दाखल अल्पवयीन मुले अंबरनाथ पूर्वेतील गायकवाड पाडा भागातील रहिवासी आहेत.

पीडित अल्पवयीन मुलाच्या आईने अंबरनाथ मधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल केलेली तक्रार आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, गेल्या महिन्यात गुन्हा दाखल चार अल्पवयीन मुलांनी आठ वर्षाच्या मुलाला पकडले. त्याला जबरदस्तीने अंबरनाथ मधील निर्जन ठिकाणी असलेल्या एका पडक्या खोलीत नेले. तेथे त्याच्यावर अश्लील पध्दतीने चार अल्पवयीन मुलांनी आळीपाळीने लैंगिक अत्याचार केले.

आठ वर्षाच्या बालकावर केलेल्या लैंगिक अत्याचाराची चार गुन्हा दाखल मुलांनी मोबाईलच्या माध्यमातून दृश्य चित्रफित तयार केली. ही चित्रफित पीडित मुलगा राहत असलेल्या भागात समाज माध्यमावर प्रसारित करून मुलाचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला. या दृश्यचित्रफितीमुळे घडलेला प्रकार उघडकीला आला. प्राथमिक तपासणी अहवालात ही तक्रार एक महिन्यानंंतर का उशीरा दाखल झाली याचे कोणतेही कारण प्राथमिक तपास अहवालात नाही. पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरू केला आहे. याप्रकरणात अद्याप कोणाला अटक करण्यात आलेली नाही, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.