अंबरनाथ : अंबरनाथ शहरातून जाणाऱ्या कल्याण बदलापूर राज्यमार्गाचे काम पाच वर्षांपूर्वी पूर्ण झाले असले तरी एमएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण आणि स्थानिक पालिकांच्या दुर्लक्षामुळे रस्त्यावर विजेचे खांब तसेच आहेत. या खांबाला धडकल्याने गेल्या आठवड्यात एक रिक्षाचालक गंभीर जखमी झाला होता. या रिक्षा चालकाचा शुक्रवारी रुग्णालयात उपचार घेताना दुर्दैवी मृत्यू झाला. रस्त्यात असलेले हे खांब हटवण्यासाठी वर्षानुवर्ष मागणी केली जाते आहे. मात्र अपघातानंतरही हे खांब हटवले जात नसल्याने संताप व्यक्त होतो आहे. कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूरपर्यंत जाणारा कल्याण बदलापूर राज्यमार्ग हा चार शहरांसाठी महत्त्वाचा आहे. पाच वर्षांपूर्वी या रस्त्याचे अंबरनाथ शहरातील काम जवळपास पूर्ण झाले होते. उल्हासनगर शहरात काही ठिकाणी आजही हा रस्ता विविध कारणांमुळे अरुंद आहे. त्यामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी कोंडी होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सर्वात वादग्रस्त आणि चर्चेचा ठरलेला हा राज्यमार्ग स्थानिक लोकप्रतिनिधींसाठी डोकेदुखी आहे. मात्र त्याच्या पूर्णत्वासाठी ठोस प्रयत्न होताना दिसत नाहीत. पाच वर्षांपुर्वी उपलब्ध जागेत कंत्राटदाराने काँक्रिटीकरण करून काम थांबवले. या काळात जलवाहिन्या हलवण्यासाठी मोठा खर्च असल्याने त्या काँक्रीट खाली गाडल्या गेल्या. तर विजेचे खांब ज्या ठिकाणी होते तेथेच राहिले. रस्ता रुंद झाल्यानंतर रस्त्याच्या कडेला असलेले हे जुने खांब आता रस्त्याच्या मधोमध आले आहेत. या खांबांच्या आड अनेक बस आणि ट्रक रात्री उभ्या केल्या जातात. काही ठिकाणी हे खांब रात्रीच्या वेळी पथदिवे बंद असल्याने दिसत नाहीत. त्यामुळे अपघात होतात. गेल्या आठवड्यात शनिवारी अंबरनाथ पश्चिमेच्या शास्त्री विद्यालयाशेजारी बदलापूरकडे जाणाऱ्या मार्गीकेवर एका खांबाला रिक्षा धडकल्याने मोठा अपघात झाला. यात मोहम्मद अरिफ सुलेमान शेख हे रिक्षा चालक गंभीर जखमी झाले. गेल्या आठवड्याभरापासून त्यांच्यावर उल्हासनगर शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

हे ही वाचा… लाचखोर सहाय्यक निबंधक आणि सहकारी अटकेत, गृहनिर्माण संस्था नोंदणीसाठी घेतली ६० हजारांची लाच

शुक्रवारी मोहम्मद शेख यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यानंतर कल्याण – बदलापूर राज्य मार्गावरील या जीवघेण्या वीज खांबांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आणखी किती अपघात झाल्यानंतर हे खांब हटवले जातील, असा प्रश्न आता उपस्थित केला जातो आहे. हे खांब हटवण्यासाठी रिक्षा चालकांनी नुकतीच अंबरनाथ नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले आहे.

हे ही वाचा… कडोंमपामधील ५८ बेकायदा इमारतींना तूर्त दिलासा, महापालिकेच्या तोडकाम कारवाईला उच्च न्यायालयाची तूर्त अंतरिम स्थगिती

यापूर्वीही एक ट्रक चालक प्राणाला मुकला

काही वर्षांपूर्वी याच राज्यमार्गावर मुख्य रस्ता आणि शेजारचा जोड रस्ता यांच्या उंचीमध्ये असमानता असल्याने तिथून जाणाऱ्या एका ट्रकला विजेच्या तारांशी संपर्क आल्याने आग लागली होती. रस्त्याची उंची वाढली असली तरी विजेच्या खांबांची उंची वाढली नसल्याने हा ट्रक त्या तारांच्या संपर्कात आला होता. यावेळी या ट्रक चालकाचा जळून मृत्यू झाला होता. त्यानंतर तातडीने एका दिवसात महावितरण, एमएमआरडीए आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने खांबांची उंची वाढवून घेतली होती. मात्र त्यानंतर निधी अभावी खांबांचे स्थलांतर रखडले आहे, अशी माहिती आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In ambernath rickshaw driver killed due to fatal pole asj