अंबरनाथ : काटई बदलापूर राज्यमार्गाचे काँक्रिटीकरणाचे काम विविध टप्प्यात सुरू करण्यात आले आहे. परंतु या कामाच्या ठिकाणी वाहतूक पोलिसांचे वाहतूक व्यवस्थापन नसल्याने वाहनचालकांची डोकेदुखी वाढली आहे. ठिकठिकाणी कोंडी होत असल्याने वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो आहे. अंबरनाथच्या टी पॉइंट चौक ते आनंदनगर एमआयडीसी रस्त्यावर कोंडी वाढली आहे. काटई ते अंबरनाथच्या टी पॉईंटपर्यंत रस्त्याचे रूंदीकरण आणि काँक्रिटीकरणाचे काम महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून सुरू आहे. यातील काटई ते खोणी फाट्यापर्यंत रस्त्याचे काँक्रिटीकरण झाल्याने येथील प्रवास गतीमान झाला आहे.
सध्याच्या घडीला याच मार्गावर नेवाळीजवळ आणि अंबरनाथच्या भागात रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यातील नेवाळी ते अंबरनाथ या भागात काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला नाल्याचे बांधकाम करण्यात आले आहे. तर अंबरनाथच्या टी पॉईंटंजवळ काही मीटरचा भाग खोदून काँक्रिटीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. अंबरनाथहून काटईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर हे काम सुरू आहे. त्यामुळे काटईहून अंबरनाथकडे येणाऱ्या मार्गिकेवरूनच दोन्ही मार्गिकांची वाहतूक होत आहे. सकाळी रस्ते मार्गाने कार्यालय, कंपनी गाठणाऱ्या वाहनचालकांना या कोंडीत अडकावे लागते आहे. त्यामुळे कार्यालयात जाण्यास उशीर होतो आहे. याच भागात अंबरनाथची विस्तारीत आनंदनगर औद्योगिक वसाहत आहे. या वसाहतीतही मोठ्या संख्येने कामगार बदलापूर, मुरबाड आणि कर्जतवरून येत असतात. त्यामुळे या कामगारांनाही कोंडीचा सामना करावा लागतो आहे.
सकाळच्या सुमारास शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची वाहनेही येथे अडकत आहेत. येथे वाहतूक पोलीसही उपस्थितीत नसतात. परिणामी फॉरेस्ट नाक्याकडून काटईकडे जाणारी वाहने वळण घेण्यासाठी टी पॉईंट चौकात गर्दी करतात. बेशीस्त वाहनचालकांमुळे बदलापुरकडे जाणारी मार्गिकाही ठप्प होते. त्यामुळे काटईकडे जाणाऱ्या मार्गिका आणि बदलापुरकडे जाणाऱ्या दोन्ही मार्गिका बंद पडतात. त्यामुळे येथे वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियोजन करण्याची मागणी होत आहे. यापुर्वीही नेवाळीजवळ वसार गावाजवळ शेतकऱ्याने जागा अडवल्याने अनेक महिने एकेरी वाहतूक होती. आता याच भागात अंबरनाथकडे जाणाऱ्या मार्गिकेवर काम सुरू असल्याने ती मार्गिका वाहतुकीसाठी बंद आहे.