ठाणे : अयोध्येत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे माझ्या खोलीत आले. आपल्याला काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. आपल्याला नरेंद्र मोदी यांच्यासोबत जावे लागेल. हे वय तुरुंगात जाण्याचे नाही असे शिंदे म्हणाले होते असा गौप्यस्फोट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला. ठाणे लोकसभेचे उमेदवार राजन विचारे यांनी मंगळवारी रात्री ठाण्यात चौक सभेचे आयोजन केले होते. त्यावेळी संजय राऊत बोलत होते. राऊत म्हणाले की, हे कसले शिवसैनिक, यांच्यासारखे डरपोक मी कधी पाहिले नाही. अयोध्येला असताना हे माझ्या खोलीत आले. काहीतरी निर्णय घेतला पाहिजे. हे आमचे तुरुंगात जाण्याचे वय नाही. आपण मोदी यांच्यासोबत जायला पाहिजे असे शिंदे म्हणत होते. आपले राज्य सरकार चांगले काम करत आहे. चांगले राज्य चालले आहे. तुम्हाला तुरुंगात पाठवण्यासारखे काय क्रांतिकारी काम केले. ज्यामुळे तुम्ही घाबरता. माझा मागे ईडी आणि सीबीआय लागली होती असे मी त्यांना सांगितले. परंतु हे महाशय पळून गेले असा दावा राऊत यांनी केला.
हेही वाचा : शाहू महाराजांना पराभूत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची १०० कोटी रुपयांची बोली
एकनाथ शिंदे हे प्रकरण ४ जूननंतर संपणार आहे. शिवसेनेत असताना यांनी सर्वकाही वाम मार्गाने लुटले. लुटीला संरक्षण हवे म्हणून मोदी यांचा मार्ग पकडला. भाजपच्या वॉशिंग मशीन मध्ये गेले. आपल्याबरोबर चाळीस जण घेऊन गेले. आनंद दिघे हे साधे, सरळ, प्रामाणिक शिवसैनिक होते. त्यांनी पदाची, सत्तेची कोणती अपेक्षा ठेवली नाही. या ठाण्यातली शिवसैनेकांची एक पिढी त्यांनी घडवली. सर्व पक्षात त्यांना मानणारे लोक होते. अशा आनंद दिघे यांना तरी आपण तोंड दाखवू शकाल का? दिघे यांच्या नावाने खोटा सिनेमा काढून त्यांचा अपमान करणाऱ्याला या ठाण्यामध्ये पाय ठेवण्याची हिंमत होता कामा नये असेही राऊत म्हणाले.