बदलापूरः आपल्या मित्रालाही प्रेमाने शिवी देऊन बोलवण्याची पद्धत तरूणांमध्ये आणि विशेषतः शालेय विद्यार्थ्यांमध्ये रूढ झाल्याचे गेल्या काही वर्षात निदर्शनास आले आहे. अनेकदा याचेच पर्यावसन वादात किंवा अविचारात होते. चुकीचे शब्द, अपशब्द तोंडी येऊ नयेत तसेच शालेय विद्यार्थी शिव्यांपासून दूर रहावेत यासाठी ठाणे जिल्ह्यातल्या बदलापूर शहरात शिवीमुक्त शाळा या अनोख्या अभियानाला सुरूवात करण्यात आली आहे. या अभियानाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

बदलापूर शहराच्या पूर्व भागात असलेल्या आदर्श महाविद्यालयाच्या सभागृहात एक आगळीवेगळी बैठक नुकतीच पार पडली. सर्वत्र परिक्षांची गडबड सुरू असतानाही अंबरनाथ तालुका, बदलापूर शहर आणि आसपासच्या परिसरातील शाळा, महाविद्यालयांचे शिक्षक, मुख्याध्यापक आणि प्राचार्य या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत चर्चा होती ती विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच शिव्यांपासून दूर कसे ठेवता येईल याची.

पंचायत समिती अंबरनाथ यांच्या शिक्षण विभागाच्या वतीने शिवीमुक्त शाळा अभियानाअंतर्गत सहविचार सभा आयोजीत करण्यात आली होती. आदर्श महाविद्यालयाच्या सभागृहात या बैठकीसाठी या संकल्पना मांडणारे मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे उपस्थित होते. यावेळी त्यांची शिवीमुक्त शाळेची संकल्पना मांडली.

विद्यार्थ्यांच्या वर्तनावर लक्ष ठेवण्याचे यावेळी आमदार किसन कथोरे यांनी शिक्षक आणि मुख्याध्यापकांना सूचित केले. सुजाण पिढीसाठी हे अभियान महत्वाचे आहे. विद्यार्थ्यांच्या तोंडी येणारे चुकीचे शब्द वेळीच रोखले पाहिजेत. त्याचसाठी हे अभियान आहे. चांगल्या विचारातून नवी पिढी घडायला हवी. त्यासाठी सर्वाचे प्रयत्न आवश्यक आहेत, अशी भूमिका यावेळी कथोरे यांनी मांडली. विद्यार्थी शिव्यांपासून दूर रहावेत, त्यांच्यावर शिक्षकांनी लक्ष ठेवावे, असे यावेळी कथोरे यांनी सूचित केले.

विद्यार्थ्यांच्या वर्तनाबाबत दंड आकारल्यास त्याची पालकांनाही जाणीव होईल. त्यामुळे या अभियानांत दंड आकारला जावा अशी सूचना यावेळी किसन कथोरे यांनी केली. त्यांच्या या अभियानाचे शालेय शिक्षक आणि मुख्याध्यापकांनीही स्वागत केले. येत्या शैक्षणिक वर्षापासून हे अभियान राबवले जाणार असून महाविद्यालयातही याचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी दृकश्राव्य माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत.

वेळेप्रसंगी समजही दिली जाणार

शाळेत विद्यार्थी अपशब्द, शिवी देत असल्यास त्याला दंड आकारला जाणार आहे. तसेच वेळ पडल्यास या विद्यार्थ्याच्या पालकांना शाळेत पाचारण करून त्यांना विद्यार्थ्याबाबत समजही दिली जाईल, असेही यावेळी बैठकीत ठरवण्यात आले आहे. या अभियानाला पालक कसे प्रतिसाद देतात हे पाहणे महत्वाचे आहे.