बदलापूर : पाचव्यांदा मोठ्या मताधिक्याने आमदार म्हणून निवडून आलेले भाजपच्या किसन कथोरेंना यंदाही मंत्रिपदाने हुलकावणी दिली आहे. भाजपाच्या एका बड्या आणि जिल्ह्याचे पालकमंत्री भूषवलेल्या एका नेत्याने जोर लावून मंत्रिपदाची माळ आपल्या गळ्यात पाडून घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे किसन कथोरे यांचे यंदाही मंत्रिपद हुकल्याच्या जोरदार चर्चा जिल्ह्यात सुरू आहेत. पाच वेळेस आमदार आणि संपूर्ण जिल्ह्यात दांडगा जनसंपर्क अशा सर्व भक्कम बाजू असताना देखील कथोरेंना मंत्रिपद न मिळाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये मोठी नाराजी पाहायला मिळत आहे.
नागपूर येथे महायुती सरकारच्या नव्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांचा शपथविधी सोहळा नुकताच पार पडला. यावेळी महायुती मधील भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या अनेक जुन्या आणि मातब्बर नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी भाजपकडून प्रामुख्याने अनेक जुन्या आणि ज्येष्ठ आमदारांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली. तर यावेळी ठाणे जिल्ह्यातून भाजपचे ज्येष्ठ आणि तब्बल पाच वेळेस आमदार राहिलेले किसन कथोरे यांना मंत्रिपद देण्यात येईल असे जवळपास निश्चित झाल्याचे बोलले जात होते. तर तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील किसन कथोरे यांचा योग्य सन्मान राखला जाईल असे वक्तव्य केले होते. तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचारा दरम्यान किसन कथोरे यांच्या मंत्रीपदाबाबत वक्तव्य केले होते. यामुळे यंदाच्या महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात कथोरे यांचे स्थान निश्चित असल्याचे बोलले जात होते.
हेही वाचा : डोंबिवलीत माणकोली पुलावरून उडी मारून तरूणीची आत्महत्या
किसन कथोरे हे सलग चार वेळेस मुरबाड विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. तर एकदा अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे त्यांनी प्रतिनिधित्व केले आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, जिल्हा बँका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कथोरे यांची मजबूत पकड आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कथोरे यांचे वर्चस्व असल्याने त्यांचा समर्थक वर्गही मोठा आहे. त्यामुळे यंदा त्यांना मंत्रिपद मिळावे अशी मागणी देखील अनेक समर्थकांनी केली होती. मात्र यंदाही त्यांना मंत्रिपदाने हुलकावणी दिली आहे. त्यामुळे याबाबत उघडपणे समर्थक बोलत नसले तरी समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे.
हेही वाचा : धक्कादायक! ठाणे जिल्ह्यातून बनावट औषधांची रुग्णांना विक्री, आंतरराज्यीय टोळीचा सहभाग असण्याची शक्यता
एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतर आणि महायुतीचे सरकार अडीच वर्षांपूर्वी पुन्हा स्थापन झाल्यानंतर ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री पदासाठी देखील किसन कथोरे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती. मात्र त्यावेळीही कथोरे यांना संधी मिळाली नाही. एकनाथ शिंदे यांनी आपला बालेकिल्ला आपल्याच हाती ठेवण्यासाठी साताऱ्याचे शंभूराजे देसाई यांना जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नेमल्याने कथोरे यांचे मंत्रीपद तेव्हाही हुकले होते.