बदलापूर : सरावासाठी नेताना बैलाने केलेल्या हल्ल्यात बैलाच्या मालकाचाच दुर्दैवी मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार बदलापुरात समोर आला आहे. बदलापूर पश्चिमेतील वालिवली भागात राहणारे विजय म्हात्रे यांचा यात मृत्यू झाला आहे. म्हात्रे एका खासगी शाळेत क्रीडा प्रशिक्षक म्हणून काम करत होते. त्यांना शर्यतीची आवड असल्याने त्यांनी बैल सांभाळत होते. मंगळवारी झालेल्या या घटनेमुळे शहरात एकच हळहळ व्यक्त होते आहे.
अंबरनाथ आणि बदलापूर परिसरात तायक्वांदो आणि स्केटिंग खेळातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे काम विजय म्हात्रे करत होते. त्यांना शर्यतीचीही आवड होती. त्यामुळे त्यांनी एक बैल सांभाळायला सुरूवात केली होती. शर्यतीमध्ये धावणाऱ्या त्यांच्या बैलावर त्यांचे विशेष प्रेमही होते. मंगळवारी नियमीतपणे म्हात्रे यांनी आपल्या बैलाला सरावासाठी बाहेर काढले. ते त्याला उल्हास नदीकिनारी घेऊन जात असताना त्यांच्याच बैलाच्या दोरीत त्यांचा पाय अडकला. त्यामुळे म्हात्रे खाली पडले. यावेळी त्यांच्याच बैलाने त्यांच्यावर हल्ला सुरू केला. खाली पडल्याने म्हात्रे स्वतःचा बचाव करू शकले नाहीत.
हेही वाचा…कल्याणमध्ये विकास कामांमध्ये अडथळे आणणाऱ्या जमीन मालकांच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई
हा प्रकार पाहून काही लोक त्यांना वाचवण्यासाठी धावले मात्र बैलाने उग्र रूप धारण केल्याने कुणी वाचवू शकले नाही. या हल्ल्यात विजय म्हात्रे यांचा मृत्यू झाला. या बैलाला काही दिवसांपूर्वी श्वानाने चावा घेतल्याची माहिती समोर येते आहे. विशेष म्हणजे या हल्ल्यानंतर बैलाचाही मृत्यू झाला. याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.