अक्षय शिंदे याच्या मृत्यूनंतर बदलापुरातील आंदोलन महिलांनी एकमेकांना पेढे भरून आनंद व्यक्त केला. मनसेच्या संगीता चेंदवणकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रियंका दामले यांच्यासह या आंदोलनात पुढाकार घेतलेल्या आंदोलक महिलांनी एकमेकांना पेढे भरून आनंद व्यक्त केला. आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व पालक, महिला आणि आंदोलकांचे त्यांनी यावेळी आभार मानले. तर शिवसेनेचे शिंदे गटाचे माजी नगरसेवक अविनाश मोरे यांनी बदलापूर पूर्वेत फटाके फोडून आनंद व्यक्त केला.
बदलापुरातील नामांकित शाळेत झालेल्या चिमूरड्यांवर अत्याचारानंतर बदलापुरात संताप व्यक्त होत होता. या गंभीर प्रकरणात शाळा व्यवस्थापनाने सुरुवातीला दुर्लक्ष करून हा प्रकार दाबण्याचा प्रयत्न केला होता. तसेच पुढे पोलिसांपर्यंत हे प्रकरण पोहोचल्यानंतर त्यांनी यात गुन्हा दाखल करण्यात दिरंगाई केली होती. त्यावेळी स्थानिक मनसेच्या महिला पदाधिकारी संगीता चेंदवणकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी पाठपुरावा केला. त्यानंतर पोलिसांच्या या कृतीवर शहरातून संताप व्यक्त होत होता. हाच संताप व्यक्त करण्यासाठी २० ऑगस्ट रोजी आंदोलनाची हाक देण्यात आली होती. या सर्व महिला पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला. विविध पक्षांच्या महिला पदाधिकारी यावेळी आंदोलनात होत्या.
हेही वाचा >>>Akshay Shinde Encounter : “…म्हणून अक्षय शिंदेचा बळी देण्यात आला”; आमदार जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
आंदोलनानंतर संगीता चेंदवणकर प्रियंका दामले यांच्यासह अनेक महिला आंदोलकांवर बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या सर्वांना बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर आणि कल्याण येथील वकील संघटनांतर्फे जामीन मिळवून देण्यात आला होता. तसेच या प्रकरणात चौकशीसाठी आंदोलकांना थेट बदलापूरहून भिवंडी पर्यंत जावे लागते आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनावर आंदोलकांचा संताप आहे.
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या मृत्यूनंतर बदलापुरातील आंदोलक महिलांनी एकमेकींना पेढे भरवून आनंद व्यक्त केला. मनसेच्या संगीता चेंदवणकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रियंका दामले यांनी आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व पालक व महिला आंदोलकांचे आभार मानले. pic.twitter.com/aHUbHi0E0z
— LoksattaLive (@LoksattaLive) September 23, 2024
मात्र सोमवारी अक्षय शिंदे च्या मृत्यूनंतर आंदोलकांनी समाधान व्यक्त करत पेढे वाटले. तर बदलापूर पूर्व येथील शिवसेनेचे माजी नगरसेवक अविनाश मोरे यांनी आपल्या प्रभागात फटाके फोडत आनंद व्यक्त केला. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी ही आमची मागणी होती. फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी आम्ही आंदोलनावेळी केली होती. त्यामुळे आरोपीला शिक्षा मिळाली अशी भावना आंदोलकांनी यावेळी व्यक्त केली.