बदलापूरः सुमारे तीन लाख लोकसंख्या असलेल्या आणि चौथी मुंबई अशी बिरुदावली मिरवणाऱ्या बदलापूर शहरात गेल्या काही वर्षात बिघडलेल्या वीज वितरण व्यवस्थेमुळे आता नागरिक मेटाकुटीस आले आहेत. एकीकडे विजेअभावी पिण्याचे पाणी मिळणेही दुरापास्त झाले असताना वीज नसल्याने ग्रामीण उपजिल्हा रूग्णालयातही वाताहत झाल्याचे चित्र दोन दिवसांपूर्वी दिसले. बदलापुरातील औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांवरही वीजसंकट असून उद्योग चालवायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे. वारंवार खंडीत होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे शाळा, बॅँकाचे व्यवहार आणि दुकानदार हैराण आहेत.
गेल्या काही वर्षात अंबरनाथ आणि बदलापूर या चौथ्या मुंबईतील दोन शहरांची लोकसंख्या वेगाने वाढली. अनेका नामांकीत बांधकाम व्यावसायिकांनी बदलापूरसारख्या शहरात गृहसंकुले उभी केली. निसर्ग, पाणी आणि मोकळीक यामुळे शहराला नागरिकांनी पसंती दिली खरी मात्र आता शहराच्या लोकसंख्येला पायाभूत सुविधा पुरवणे यंत्रणांना कठीण होते आहे. त्यातही विजपुरवठा यंत्रणा काळानुरूप सक्षम झाली नाही. गेल्या काही दिवसात येथील महावितरणाच्या यंत्रणेने वीज पुरवठा करण्यासाठी सक्षम नसल्याचे दाखवून गुढघे टेकले आहेत. त्याचा परिणाम संपूर्ण शहरातील नागरिकांच्या आयुष्यावर होतो आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या यंत्रणेलाही सुरळीत वीजपुरवठा होत नसल्याने शहरात पाणीबाणी आहे. खुद्द प्राधिकरणाने याबाबत नागरिकांना सूचीत करत पाणी व्यवस्थापन करण्याचे आवाहन केले आहे. जलशुद्धीकरण केंद्राला होणारा पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू असून त्यासाठी स्थानिक आमदार, महावितरणाचे वरिष्ठ आणि स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क सुरू असल्याचे प्राधिकरणाच्या अभियंत्या माधुरी पाटील यांनी सांगितले आहे. दोनच दिवसांपूर्वी एका रोहित्राच्या दुरूस्तीमुळे येथील उपजिल्हा रूग्णालयाला पाच तास विजेविना काढावे लागले. रूग्णालयाची पर्यायी व्यवस्था सक्षम नसल्याने रूग्णांना त्याचा फटका बसला. त्यावरून गदारोळ झाल्यानंतर महावितरणाकडून रूग्णालायातील रोहित्राची दुरूस्ती करण्याऐवजी थेट नवे रोहित्र बसवून देण्यात आले.
हेही वाचा : ठाण्यात उंची मार्गरोधक कोसळला, मार्गरोधक अंगावर पडून दुचाकीस्वार जखमी
सहा महिन्यात २७५ वेळा वीज खंडीत
आधीच औद्योगिक वसाहतींभोवती वाढलेल्या रहिवासी इमारतींमुळे धोक्यात सापडलेल्या आणि स्थलांतरणाची टांगती तलवार असलेल्या बदलापूरच्या औद्योगिक वसाहतीतील उद्योगांना आता सातत्याने खंडीत होणाऱ्या वीज पुरवठ्याचा फटका बसतो आहे. येथील उद्योजकांच्या बदलापूर इंडस्ट्रीयल वेल्फेअर असोसिएशन अर्थात बिवा संघटनेने गेल्या सहा महिन्यात २७५ वेळा वीज पुरवटा खंडीत झाल्याची नोंद केल्याची माहिती संघटेनेचे अध्यक्ष कुशल जैन यांनी दिली आहे. या औद्योगिक क्षेत्रात २९० कंपन्या असून त्यात कापड उद्योग, रसायन आणि अभियांत्रिकी कंपन्यांचा समावेश आहे. रासायनिक कंपनीत प्रक्रियेवेळीच वीज खंडीत झाल्यास काही अपघात घडण्याचीही भीती जैन यांनी व्यक्त केली आहे.
शाळा, कार्यालयांनाही फटका
सातत्याने खंडीत होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे लहान शाळा, दुकानदार, कार्यालयांनाही फटका बसतो आहे. बॅंकांचे कामही विजेअभावी खोळंबते. तर शीतगृह, शीतकपाट असणाऱ्या दुकानदारांना याचा त्रास सहन करावा लागतो आहे.
बदलापुरात विविध कारणांमुळे मध्यंतरी वीज पुरवठा खंडीत झाला होता. आता आवश्यक देखभाल दुरूस्तीची कामे सुरू आहेत. तशा सुचनाही मिळाल्या आहेत.
सुधाकर सुराडकर, कार्यकारी अभियंता, महावितरण बदलापूर.