कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने नागरिकांच्या सोयीसाठी पूर्व भागात उभी केलेली भाजी मंडई सुरू करण्यास नगरपालिकेला अद्याप मुहूर्त सापडत नसल्यामुळे ही इमारत अक्षरश: धूळ खात पडून आहे. पूर्वीच्या प्रशासकीय कार्यालयाजवळ भाजी मंडईची इमारत नगर परिषदेने उभी करून आता चार वर्षे झाली आहेत. ही मंडई सुरू झाली तर आसपासच्या रहिवाशांना बाजारहाट करणे सोयीचे ठरणार आहे, तसेच पदपथ अडवून बसणाऱ्या फेरीवाल्यांचा प्रश्नही मार्गी लागू शकणार आहे. असे असताना गेली चार वर्षे मंडईची इमारत बंदच असून सध्या या मंडईत अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. काही रहिवासी या ठिकाणी बेकायदा वाहने उभी करू लागले आहेत.

शहरात मोठय़ा प्रमाणावर भाजी विक्रेते व ग्राहकांची संख्या लक्षात घेऊन नगरपालिकेने राज्य सरकारच्या वैशिष्टय़पूर्ण अनुदानातून ही मंडई उभारली आहे. तत्कालीन नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांच्या हस्ते १३ ऑगस्ट २०११ रोजी या मंडईच्या इमारतीचा मोठय़ा धूमधडाक्यात शुभारंभ सोहळा उरकण्यात आला. राज्य सरकारच्या वैशिष्टय़पूर्ण अनुदानातून उभारण्यात आलेल्या या इमारतीत तळमजल्यावर छोटय़ा आकाराचे ३९ गाळे उभारण्यात आले असून पहिल्या मजल्यावर २९९२ फुटांचे सभागृह आहे. सदर गाळे व सभागृह जाहीर लिलाव करून भाडेतत्त्वावर देण्यात येणार असल्याने १७ सप्टेंबर २०११ रोजी यासंबंधीच्या निविदा मागविण्यात आल्या. या निविदांस फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे कमी प्रतिसादामुळे या निविदा २०१२ सालापर्यंत उघडण्यातच आल्या नाहीत. याबाबत नगरसेवकांनी सभागृहात ओरड केल्यानंतर तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी निविदा लवकरच उघडण्याचे आश्वासन दिले होते. नंतर प्राप्त निविदा उघडल्यावर, लिलाव पद्धतीप्रमाणे पालिकेने ३२ गाळे करारान्वये हस्तांतरित केले होते. यातील मुख्य विरोधाभास असा की, ३२ जणांना गाळ्यांचा ताबा मिळूनदेखील त्यांनी भाजीचा व्यवसाय सुरू केलेला नाही. जर भाजी विक्रेत्यांनीच हे गाळे घेतले असतील तर ते व्यवसाय करण्यास का येत नाहीत, हा प्रश्न सध्या प्रशासनाला पडला आहे.

परंतु चार वर्षे झाल्यानंतर ही वास्तू अजूनही ओस पडल्याने या इमारतीत भिकारी निवासाचे स्थान म्हणून वापर करीत असून येथे अस्वच्छतेचे साम्राज्य पसरल्याचे दिसून येत आहे. तसेच मंडईपुढील मोकळ्या जागेत नागरिक वाहने उभी करीत आहेत. त्यामुळे लाखोंचा खर्च करून बांधलेल्या मंडईचा आता अस्वच्छतेने ताबा घेतला असून पालिकेचा खर्च वाया गेल्याची चर्चा नागरिक करीत आहेत. दरम्यान, गाळेधारकांना पालिका नोटीस बजावणार असल्याची माहिती पालिकेतील एका अधिकाऱ्याने दिली.

Story img Loader