बदलापूरः मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार किसन कथोरे यांना आता भाजपातून उघड आव्हान दिले जात असून मुरबाडमध्ये नुकताच निष्ठावंतांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात कपिल पाटील यांनी किसन कथोरेंना नाव न घेता भाजप सोडून अपक्ष लढा आणि ताकद दाखवा असे थेट आव्हान दिले. विशेष म्हणजे मुरबाड विधानसभा मतदारसंघातून एकेकाळी कथोरे यांच्या भाजप प्रवेशासाठी आघाडीवर असलेले पदाधिकारीही यात मंचावर बसून होते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपात जुन्या जाणत्यांची वेगळी फळी उभारून कथोरेंना कोंडीत पकडण्याचे प्रयत्न केले जाणार असल्याची चर्चा आहे.

हेही वाचा : कल्याण-डोंबिवलीत बेकायदा इमारतींमधील सदनिकांची दस्त नोंदणी सुरूच, बनावट कागदपत्रांच्या आधारे घर खरेदीदारांची फसवणूक

दहा वर्षांपूर्वी २०१४ मध्ये तत्कालिन विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या शासकीय बंगल्यावर मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार किसन कथोरे यांनी भाजपात प्रवेश केला होता. त्यावेळी कथोरे यांच्यासोबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची मोठी फळी भाजपात आली. कथोरे यांना भाजप पदाधिकाऱ्यांनी तात्काळ स्विकारले. मात्र कालांतराने भाजपातील जुने पदाधिकारी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून भाजपात आलेले पदाधिकारी असे दोन गट अनेकदा दिसून आले. गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपात उघड दुफळी दिसली. माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या पराभवानंतर मुरबाड विधानसभा मतदारसंघातही पाटील समर्थक आणि कथोरे समर्थक असे गट दिसले. पाटील यांनी कथोरे यांच्यावर वेळोवेळी हल्ले चढवले आहेत. त्यातच रविवारी मुरबाडमध्ये कपिल पाटील यांच्या नेतृत्वात निष्ठावंतांचा मेळावा आयोजीत करण्यात आला होता. या मेळाव्यात कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राम पातकर, संघ आणि भाजपचे निष्ठावंत समजले जाणारे शरद म्हात्रे, आण्णा कुलकर्णी यांच्यासह ग्रामीण भागातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते. किसन कथोर विरूद्ध कपिल पाटील संघर्ष विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तीव्र होत असतानाच झालेल्या निष्ठावंतांच्या मेळाव्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे. यावेळी बोलताना कपिल पाटील यांनी कथोरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. लोकसभेला काही जणांनी पक्षविरोधी काम केले. आता केंद्र सरकारकडून मंजूर करून आणलेल्या कामांचे श्रेय काही लोक घेत आहेत. त्यांना उत्तर दिले पाहिजे असे पाटील यावेळी म्हणाले. आधी काही लोक बोलायचे माझ्या मतदारसंघात काम शिल्लक राहिली नाहीत. मग आता कसली भूमीपूजन करत आहात, असा सवालही पाटील यांनी अप्रत्यक्षपणे कथोरे यांना विचारला. निष्ठावंत भाजप पदाधिकाऱ्याला भाजपची भूमिका मांडू न देणाऱ्यांना थांबवल पाहिजे. भाजपची ताकद बाजूला करून तुम्ही अपक्ष लढून दाखवा, असे थेट आव्हानच पाटील यांनी कथोरे यांना दिले. तसेच मतदारसंघात निष्ठावंतावर अन्याय होऊ देणार नाही, असे सांगत विधानसभेत कथोरे यांना पाटील यांनी इशाराच दिला दिला. या निष्ठावंतांच्या मेळाव्यामुळे मुरबाड विधानसभा मतदारसंघात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

हेही वाचा : लाडकी बहीणींना योजनेचा अर्ज घ्यावा लागतोय विकत, दुकानदारांकडे हे अर्ज कसे पोहोचले असा प्रश्न उपस्थित

मेळाव्याच्या बॅनरवर असलेल्या निष्ठावंत शब्दामुळे मेळाव्याला गेलो. पक्षातील जुन्या, निष्ठावंतांना बाजूला सारण्यात आले आहे हे खरे आहे. ही कृतघ्नता आहे. आम्हाला विचारात घेतले जात नाही. त्यामुळे भावना मांडण्यासाठी मेळाव्यात होतो.

शरद म्हात्रे, जुने भाजप पदाधिकारी, बदलापूर.

अपक्ष लढण्याचा प्रश्नच येत नाही. मला पक्षच विधानसेभेचे तिकीट देत आहे तर मी का अपक्ष लढू.

किसन कथोरे, आमदार, मुरबाड.

Story img Loader