बदलापूर : वाढत्या नागरिकरणात ज्येष्ठांसह सर्वांना विरंगुळ्याची ठिकाणे आणि मुलांना खेळण्यासाठीची उद्याने कमी होत असताना बदलापुरातील अस्तित्वात असलेले मोठे उद्यान आणि उल्हास नदीकाठची चौपाटी ऐन रविवारी अंधारात होती. बदलापूर पश्चिमेतील हेंद्रेपाडा परिसरातील धर्मा खारकर उद्यानातील विद्युत व्यवस्था सुट्टीतल्या ऐन रविवारच्या सायंकाळी बंद होती. त्यामुळे मुलांना मोबाईच्या उजेडात खेळावे लागत होते. तर उल्हास नदीकाठची चौपाटीही अंधारात होती. त्यामुळे नागरिक संताप व्यक्त होत होते.

बदलापूर शहरात गेल्या काही वर्षात लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. शहरातील उद्यानांची संख्या तुलनेने अधिक नाही. शहरातून जाणाऱ्या उच्चदाब विद्युत वाहिनीखाली अनेक ठिकाणी उद्याने तयार करण्यात आली आहेत. मात्र शहरातील अनेक महत्वाच्या उद्यानांमध्ये विविध बांधकामे करण्यात आली आहेत. त्यामुळे आधीच त्यांची जागा कमी झाली आहे. बदलापूर पश्चिमेतील हेंद्रेपाडा येथे पालिकेच्या आरक्षित जागेवर भव्य धर्मा खारकर उद्यान उभारण्यात आले आहे. मांजर्ली, हेंद्रेपाडा, दुबे बाग, बेलवलीपासून आसपासच्या भागातून दररोज अनेक नागरिक, लहान मुले येथे खेळण्यासाठी, फेरफटका मारण्यासाठी येत असतात.

सध्या शाळांना परिक्षा संपल्याने सुट्ट्या लागल्या आहेत. त्यामुळे या उद्यानात मोठ्या प्रमाणावर मुले येत असतात. रविवारी या मुलांची गर्दी अधिक वाढते. मात्र रविवारी सायंकाळी या उद्यानातील वीज पुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळे सुर्यास्तानंतर उद्यानात अंधार पसरला होता. त्यामुळे मुलांना खेळताना हिरमोड होत होता. तरीही मुलांच्या हट्टापायी पालकांनी त्यांना अंधारात खेळवावे लागले. अशावेळी अनेक पालकांनी मोबाईलमधील प्रकाशात मुले खेळवली. यावेळी काही मुलांच्या एकमेकांना धडकाही झाल्या.

उद्यानाप्रमाणेच उल्हास नदीवरील चौपाटी ही नागरिकांसाठी निवांत बसण्याची हक्काची जागा आहे. मात्र रविवाही या चौपाटीवर उड्डाणपुलाशेजारचा एकमेव उंच दिवा सुरू होता. मात्र चौपाटीवरची सर्व विद्युत सुविधा बंद होती. परिणामी येथूनही अनेकांना रविवारी काढता पाय घ्यावा लागला. त्यामुळे नागरिकांचा हिरमोड होत होता.

पालिकेची दुरूस्ती यंत्रणा कुचकामी ?

पालिकेच्या विद्युत विभागाला काही पालकांनी उद्यानातील वीज बंद असल्याची तक्रार केली होती. मात्र रात्री नऊ वाजेपर्यंतही उद्यानातील वीज पुरवठा सुरू झालेला नव्हता. उद्यानातील विद्युत यंत्रणा उष्णतेमुळे नादुरूस्त झाल्याची माहिती पालिकेच्या विद्युत विभागाचे प्रमुख अभिजीत ताम्हाणे यांनी दिली. तर सोमवारी दुपारी १२ वाजता उद्यानातील वीज पुरवठा सुरळीत करण्यात आल्याची माहिती कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी मारूती गायकवाड यांनी दिली.