बदलापूर: अवघ्या काही दिवस पडलेल्या किरकोळ पावसातच बदलापूरच्या एकमेव उड्डाणपुलावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे येथून प्रवास करताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते आहे. येत्या काळात येथील दुरुस्ती न केल्यास खड्डे वाढून वाहतूक कोंडी होण्याची भीती व्यक्त होते आहे. बदलापूर शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणारा एकमेव उड्डाणपूल कायम वाहतूक कोंडीत असतो. त्यात खड्ड्यांमुळे येथील प्रवास आणखी खडतर होण्याची भीती व्यक्त होते आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : डोंबिवलीत क्लिनरने बेदरकारपणे टेम्पो चालविल्याने वस्तू वितरक तरूणाचा मृत्यू

बदलापूर शहरात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले आहे. शहराच्या लोकसंख्येसह शहरातील वाहनांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. बदलापूर शहराचे मध्य रेल्वेच्या रुळांमुळे दोन भाग झाले असून त्यामुळे शहर पूर्व आणि पश्चिम अशा दोन भागात विभागले गेले आहे. शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागाला जोडण्यासाठी बदलापूरच्या मध्यवर्ती भागात एकमेव उड्डाणपूल आहे. शहरातील बहुतांशी वाहतूक या एकमेव उड्डाणपुलावरून होत असते. बेलवली भागात एक छोटेखानी भुयारी मार्ग आहे. मात्र अरुंद असल्याने येथून फक्त छोटी आणि हलकी स्वरूपाची वाहने जाऊ शकतात. त्यामुळे उड्डाणपुलाचे महत्व अधिक आहे. आता गेल्या काही दिवसांत पडलेल्या किरकोळ पावसात या एकमेव उड्डाणपुलावर खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. पूर्व भागातून पश्चिम भागाकडे येणाऱ्या मार्गिकेवर उड्डाणपुलाच्या मध्यभागीच खड्डे पडले असून त्यामुळे येथून जाताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते आहे. खड्डे वाचवण्यासाठी अनेक वाहन चालक उलट्या दिशेच्या मार्गीकेतून प्रवास करण्याचा प्रयत्न करतात. मात्र यामुळे अपघात होण्याची भीतीही व्यक्त होते आहे. सध्याच्या घडीला पडलेले खड्डे खोल असल्याने अनेक वाहन चालकांचा तोल जातो आहे. पाऊस पडल्यास या खड्ड्यात पाणी साचल्याने खड्ड्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघात होण्याची भीती ही व्यक्त होते आहे. त्यामुळे तातडीने हे खड्डे बुजवण्याची मागणी वाहन चालकांकडून केली जाते आहे.

हेही वाचा : स्नॅपचॅट डाऊनलोड करण्यास वडिलांनी विरोध केल्याने डोंबिवलीत तरूणीची आत्महत्या

दुसऱ्या उड्डाणपुलाची प्रतीक्षाच

बदलापूर शहरात वाहनांची संख्या वाढत असली तरी एकमेव उड्डाणपुलाला पर्यायी उड्डाणपूल उभारण्यात यश आलेले नाही. काही महिन्यांपूर्वी बेलवली भागात उड्डाणपुलाचे आरेखन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. मात्र रेल्वे मार्गाच्या तिसऱ्या आणि चौथ्या मार्गीकीमुळे याला विलंब झाला. त्यानंतर नव्या उड्डाणपुलाची प्रतीक्षाच आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In badlapur potholes on flyover after monsoon rain css