बदलापूरः मला आमदारकीच्या निवडणुकीत यश आले नाही. तुमच्यासारखे सर्वसामान्य माझ्या पाठिशी असते तर बदलापुरचे सिंगापूर करून दाखवले असते. पण एका मंचावर या आणि चर्चा करा त्यांच्यापेक्षा शहरात ८० टक्के जास्तच निधी आणला असेल, असा दावा शिवसेनेचे बदलापूर शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी केला आहे. खान्देश महोत्सवात बोलताना म्हात्रे यांनी वक्तव्य केले. म्हात्रे यांचा रोख नक्की कुणावर होता यावर चर्चा सुरू आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून वामन म्हात्रे आणि भाजपचे आमदार किसन कथोरे यांच्या वाकयुद्ध सुरू आहे.

बदलापूर शहरातील शिवसेना आणि भाजपच्या प्रमुख नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार युद्ध सुरू आहे. शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे आणि भाजपचे मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांच्यात उघड संघर्ष सुरू आहे. विधानसभेपूर्वी कथोरे यांनी म्हात्रे यांचे निकटवर्तीय असलेल्या एका उपशहप्रमुखाला भाजपाच प्रवेश देत म्हात्रे यांच्यावर कुरघोडीचा प्रयत्न केला. त्यामुळे म्हात्रे यांनी कथोर यांच्याविरूद्ध विधानसभा निवडणुक प्रचारा आघाडी उघडली. त्यामुळे शिवसेनेचा एक गट प्रचारापासून दूर होता. विजयानंतर कथोरे यांनी म्हात्रेंसह अनेकांना जाहीर आव्हान देत इशारा दिला होता. तेव्हापासून कथोरे आणि म्हात्रे यांच्यात विस्तवही जात नाही. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कथोरे यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून पालिकेच्या कारभारावर आणि महिलांना वाटण्यात आलेल्या शिलाई यंत्र तसेच घरघंटी उपक्रमात गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला होता. या दोन्ही विषयांच्या माध्यमातून वामन म्हात्रे यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा शहरात रंगली होती.

त्यातच आता वामन म्हात्रे यांनी एका कार्यक्रमात बोलताना शहरात सर्वाधिक निधी आणल्याचा दावा केला आहे. बदलापूर पूर्वेत आयोजीत खान्देश महोत्सवात वामन म्हात्रे बोलत होते. बदलापूर शहरातल्या विविध भागात विविध विकासकामे सुरू आहेत. शहरात पाण्याचा प्रश्न आहे. पण एकनाथ शिंदेंनी पाणी योजना घोषीत केली. येत्या १५ दिवसात त्याची निविदाही निघेल. तर मंत्री गुलाबराव पाटील यांना १० दशलक्ष लीटर पाण्याची मागणी केली होती. त्यांनी ती मंजूर केली. योजनेसाठी पाण्याचे आरक्षण पाहिजे. मंत्री पाटील यांनी ३ दशलक्ष लीटर पाणी दिले आहे. तर लवकरच २ दशलक्ष लीटर पाणीही मिळेल. मला आमदारकीत यश आले नाही. तुमच्यासारखे सर्वसामान्य माझ्या पाठीशी राहिले असते तर बदलापूरचे सिंगापूर करून दाखवले असते, असे म्हात्रे यावेळी म्हणाले.

मी जगातले ८५ देश फिरलो आहे. तीकडे पायाभूत सुविधा पाहिल्या की वाटते बदलापूर खूप मागे आहे. तरी आम्ही पालिकेच्या क्षमतेनुसार काम केले आहे. दोनच दिवसांपूर्वी एकनाथ शिंदेंना भेटून पाण्याच्या प्रश्नावर बोललो. शहरात काही टँकरमाफिया आहेत. त्यांना हद्दपार करायचे आहे, असेही म्हात्रे यावेळी म्हणाले. तसेच यावेळी बोलताना त्यांनी आव्हान दिले. विकासाबद्दल बोलणाऱ्यांना एकाच व्यासपीठावर घ्या. शहरात त्यांच्यापेक्षा ८० टक्के निधी मी आणला नसेल तर भारतात राहणार नाही, असे म्हात्रे म्हणाले. मी परदेशात जाऊन राहिल, असेही म्हात्रे म्हणाले. त्यांच्या वक्तव्याने शहरात अनेक चर्चा रंगल्या आहेत. म्हात्रे यांनी कथोरे यांनाच आव्हान दिल्याचे बोलले जाते. यावेळी वामन म्हात्रे यांनी बदलापुरात खान्देश महोत्सव उभारण्याचीही घोषणा केली.