बदलापूर : वरिष्ठ गटाच्या ५४ व्या महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धेत महिला गटात नागपूर संघाने पुणे संघाला नमवत अजिंक्यपदावर आपले नाव कोरले. तर पुरूष गटात मुंबई संघाने नागपूरच्या संघाला पराभूत करत अजिंक्यपद मिळवले. अविष्कार सांस्कृतिक व क्रीडा मंडळ तसेच व्हॉलीबॉल असोसिएशन ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत ही स्पर्धा बदलापूर पश्चिमेतील बदलापूर जिमखाना येथे रंगली. मानाची समजली जाणारी महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल अजिंक्य पद स्पर्धा नुकतीच बदलापुरात पार पडली. गेल्या ५४ वर्षांच्या इतिहासात मुंबई महानगर प्रदेशात पहिल्यांदाच या स्पर्धेचे आयोजन करण्याचा मान ठाणे जिल्ह्याला आणि बदलापूर शहराला मिळाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बदलापूर जिमखाना येथील भव्य मैदानात चार दिवस ही स्पर्धा रंगली. स्पर्धेचे उद्घाटन मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे, शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आणि माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे तसेच आयोजक आणि ठाणे व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष किरण भोईर यांच्या हस्ते पार पडले. या स्पर्धेत राज्यभरातील ३४ जिल्हा संघांनी आपला सहभाग नोंदवला. पुरूष आणि महिला अशा दोन गटात संपन्न झालेल्या या स्पर्धेत एकूण ९०० खेळाडूंनी सहभाग घेतला. सर्व फेऱ्या पार करत महिला गटात पुणे आणि नागपूर यांच्या अंतिम सामना रंगला. त्यात नागपूर संघाने ३-२ अशा डावात पुणे संघाचा पराभव केला. तर पुरूष गटात नागपूर आणि मुंबई यांच्यात अंतिम लढत झाली. यात मुंबईने सुरूवातीपासून सामन्यावर पकड ठेवत ३-१ असा दणदणीत विजय मिळवला.

हेही वाचा : विठ्ठलवाडी- कल्याण नगर उन्नत मार्गाला मंजुरी, एमएमआरडीएकडून ६४२.९८ कोटींची प्रशासकीय मान्यता

चार दिवस चाललेल्या या स्पर्धेत राज्यभरातून प्रेक्षकांनी हजेरी लावली होती. तर अंतिम सामन्यासाठी क्रीडाप्रेमींनी तुफान गर्दी केली होती. या स्पर्धेदरम्यान विविध खेळांमध्ये शिछत्रपती पुरस्कार विजेत्या ज्येष्ठ आणि तरूण खेळांडूंना गौरवण्यात आले. खेळाप्रती जनजागृती निर्माण व्हावी यासाठी शहरात फेरी काढण्यात आली होती. या व्हॉलीबॉल स्पर्धेच्या आयोजनामुळे बदलापूर शहरात असलेल्या क्रीडा सुविधांची आणि खेळाडूंची माहिती राज्याला मिळाली. यातून खेळाला प्रोत्साहन मिळेल अशी आशा ठाणे व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष किरण भोईर यांनी व्यक्त केली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In badlapur state volleyball championship in women category nagpur team in men category mumbai team won css