बदलापूरः गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली पथविक्रेत्यांची अधिकृत यादी अखेर कुळगाव बदलापूर नगरपालिका प्रशासनाने जाहीर केली आहे. शहरातील अधिकृत ९९२ पथविक्रेत्यांचा या यादीत समावेश आहे. ऑनलाईन पद्धतीने झालेल्या सर्वेक्षणानंतर ही यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीनंर आता पथविक्रेता समितीची निवड केली जाईल. त्यानंतर शहरातील फेरिवाला क्षेत्र, फेरिवाल्यांसाठी जागा निश्चितीची प्रक्रिया करणे सोपे होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या काही वर्षात मुंबई महानगर प्रदेशातील शहरांची लोकसंख्या झपाट्याने वाढली. या लोकसंख्येसोबतच शहरातील रस्ते, पदपथ हे फेरिवाले, विक्रेत्यांकडून अडवले जात आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्याचा फटका सहन करावा लागतो. या फेरिवाल्यांवर अनेकदा कारवाई होते. मात्र त्याच जागेवर पुन्हा फेरिवाले येऊन बसतात. फेरिवाला क्षेत्र जाहीर करून काही निश्चित ठिकाणी फेरिवाल्यांना उपजिविकेसाठी मदत व्हावी म्हणून केंद्र सरकारने पथविक्रेता उपजिवीका संरक्षण व पथ विक्री विनियमन अधिसूचना जाहीर केली होती. त्यानुसार शहरातील फेरिवाल्यांचे सर्वेक्षण करून त्यांची यादी जाहीर करणे अपेक्षित होते. कुळगाव बदलापूर नगरपालिका क्षेत्रात फेरिवाल्यांचे सर्वेक्षण २०२२ मध्ये करण्यात आले होते. फेरिवाले विक्री करत असलेले ठिकाण, त्यांची ओळख, त्याचे पुरावे अशा गोष्टी त्यांच्याकडून घेण्यात आल्या होत्या, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. त्यानंतर मंगळवार, ४ फेब्रुवारी रोजी पालिका प्रशासनाने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर आणि पालिका मुख्यालयात अधिकृत पथविक्रेते अर्थात फेरिवाल्यांची यादी जाहीर केली. या यादीत ९९२ फेरिवाल्यांचा समावेश असल्याची माहिती पालिकेचे श्रीकांत निकुळे यांनी दिली आहे. आहे. नागरिक आणि पथविक्रेत्यांसाठी ही यादी सार्वजनिक करण्यात आली आहे.

यादीमुळे नेमके काय होणार ?

फेरिवाल्यांच्या यादीमुळे शहरातील अधिकृत फेरिवाल्यांची माहिती आणि त्यांचे स्थान पालिका प्रशासनाला कळले आहे. त्यामुळे यापुढे अधिकत पथविक्रेते अथवा फेरिवाले सोडून इतरांवर कारवाई करण्याचा मार्ग मोकळा होईल. रस्ते, पदपथ मोकळे ठेवण्यासाठी कारवाई आवश्यक असते.

फेरिवाला क्षेत्रही घोषीत होणार

कुळगाव बदलापूर नगरपालिकेतर्फे लवकरच पथविक्रेते समिती स्थापन केली जाईल. यात ८ सदस्य पथविक्रेत्यांमधील असतात. तर काही सदस्य पालिकेचे अधिकारी असतात. २० जणांच्या या समितीच्या निवडीनंतर शहरातील फेरिवाला क्षेत्र निश्चित करणे सोपे जाईल. लोकसंख्या, वर्दळीची ठिकाणे, रेल्वे स्थानकापासून १५० मीटर दूर अशा पद्धतीने फेरिवाला क्षेत्रा घोषित केला जाऊ शकतो, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.

प्रतिक्रियाः पालिका प्रशासनाने पथविक्रेत्यांची यादी जाहीर केली आहे. लवकरच पथविक्रेता समिती निवडली जाईल. त्यासाठी पथविक्रेत्या सदस्यांची निवडणुक लवकरच होऊन प्रक्रिया पूर्ण केली जाईल. – मारूती गायकवाड, मुख्याधिकारी, कुळगाव बदलापूर नगरपालिका.