बदलापूरः गेल्या आठवडाभरात बदलापूर शहरातील तीन अनधिकृत शाळांविरूद्ध शिक्षण विभागाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चार दिवसांपूर्वी बदलापूर पश्चिमेतील स्टारलाईट इंटरनॅशनल स्कूलवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर आता बदलापूर पूर्वेतील अनिरूद्ध हायस्कुल आणि ज्युनियर कॉलेज तसेच चैतन्य टेक्नो अशा दोन शाळांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बदलापूर शहरातील अनधिकृत शाळांच्या यादीत दिवसेंदिवस भर पडते आहे. काही दिवसांपूर्वी बदलापूर पश्चिमेतील एका शाळेत विद्यार्थीनीचा विनयभंग झाल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर राज्य बाल हक्क आयोगाच्या सदस्यांनी या शाळेला भेट दिली. या शाळेच्या तपासणीत शाळेतील काही बहुतांश वर्ग परवानगी शिवाय चालवले जात असल्याची बाब समोर आली होती. त्यामुळे येथील तत्कालीन शिक्षणाधिकारीही वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. त्यांना पुढे या पदावरून मुक्त करण्यात आले होते. तर शाळेतील विविध वर्गांतील विद्यार्थ्यांना आसपासच्या शाळेत समाविष्ट करण्यात आले होते. या प्रकारामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती.
त्यानंतर शहरातील अनधिकृतपणे सुरू असलेल्या शाळांचा विषय ऐरणीवर आला होता. स्थानिक शिक्षण विभागाकडून तालुक्यातील शाळांची पाहणी केली जात होती. त्यानंतर शिक्षणाधिकारी डॉ. विशाल पोटेकर यांनी अंबरनाथ तालुक्यातील अनेक शाळांना शाळा बंद करण्याची नोटीस दिली होती. मात्र या नोटीसीनंतरही शाळा सुरू असल्याची बाब शिक्षण विभागाच्या निदर्शनास आली होती. त्यामुळे अशा शाळा बंद करण्यासाठी आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी हालचाली सुरू केल्या होत्या.
चार दिवसांपूर्वी बदलापूर पश्चिमेतील सोनिवली येथील स्टारलाईट इंटरनॅशनल स्कूलवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर आता शुक्रवारी बदलापूर पूर्वेतील दोन शाळांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात बदलापूर पूर्वेतील प्रस्तावित पनवेल मार्गावरील कात्रप भागातील अनिरूद्ध हायस्कुल व ज्युनियर कॉलेज या शाळेचा समावेश आहे. तर शिरगाव येथील चैतन्य टेक्नो स्कुल या शाळेचाही यात समावेश आहे. अनधिकृतपणे शाळा चालू ठेवून कोणतीही शासकीय परवानगी न घेता शाळा चालू ठेवण्याप्रकरणी शिक्षण विस्तार अधिकारी मालू शिंदे यांच्या फिर्यादीवरून हे गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. या शाळांना यापूर्वी नोटीस देण्यात आल्याची माहिती अंबरनाथ पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने दिली आहे. त्यामुळे शाळा व्यवस्थापकांचे धाबे दणाणले आहेत.
पालकांसमोर चिंता
सध्या विविध शाळांमध्ये पालक प्रवेशासाठी धावपळ करत आहेत. नव्याने अंबरनाथ, बदलापुरात वास्तव्यासाठी स्थलांतरीत झालेल्या अनेकांना शहरांतील शाळांची माहिती नाही. अशावेळी शिक्षण विभागाकडून शाळांवर कारवाई केली जाते आहे. मात्र अशा किती अनधिकृत शाळा सुरू आहेत याची माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे नेमक्या कोणत्या शाळेत प्रवेश घ्यावा असा प्रश्न पालकांना पडला आहे.