भाईंदर : महिनाभराहून अधिक कालावधी पूर्ण झाल्यानंतरही मीरा भाईंदर मधील बेकायदेशीर शिवसेनेच्या कंटेनर शाखेवर कारवाईची मोहीम पालिकेने हाती घेतलेली नाही. त्यामुळे आगामी दिवसांत शहरात अनधिकृत बांधकामात वाढ होण्याची भीती निर्माण झाली आहे. मीरा भाईंदर शहरात शिवसेना (शिंदे गट) पक्षाकडून रस्त्यावर तसेच पदपथावर भगव्या रंगाचे कंटेनर बसवून त्यांना शाखेचे स्वरूप देण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महिना भरापूर्वीच स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते याचे उदघाटन करण्यात आले आहे. मात्र शहरातील मुख्य चौकात तसेच पदपथ अडवून या शाखा उघण्यात आल्यामुळे यावर भाजप व राष्ट्रवादी वगळता अन्य विरोधी पक्षांकडून आक्षेप नोंदवाण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे कोणत्याही परवानगी शिवाय या शाखा उघडण्यात आल्या आहे. त्यामुळे यावर कारवाई करण्याची मागणी पालिका आयुक्तांकडे करण्यात आली होती.

हेही वाचा : ठाणे जिल्ह्यात केवळ ११ टक्केच नागरिकांना वर्धक मात्रेचे कवच; करोना वाढू लागताच मात्रा घेण्याचे आवाहन

त्यानुसार या शाखेसह शहरातील अन्य राजकीय पक्षाच्या अनधिकृत कार्यालयावर कारवाई करणार असल्याचे आयुक्त संजय काटकर यांनी जाहीर केले होते. मात्र यास आता महिनाभराचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्याच पक्षाच्या कार्यालयावर कारवाई केल्यानंतर त्रास होण्याची भीती असल्यामुळे अधिकारी याकडे कानाडोळा करत आहेत. तर याबाबत अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी बोलण्यास साफ नकार दिला आहे. “जनतेची सेवा करण्यासाठी आम्ही हे कार्यालय उभारले आहेत. ज्या दिवशी महापालिका ते काढण्यास सांगतील तेव्हा ते आम्ही काढून टाकू”, असे आमदार प्रताप सरनाईक (शिंदे गट ) यांनी म्हटले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In bhaindar no action taken against illegal container branches of shivsena eknath shinde party css
Show comments