भाईंदर : एका अल्पवयीन तरुणीचा विनयभंग करून तिच्यावर इस्लाम धर्म कबुल करण्यासाठी नकली बंदुकीने धमकावल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकऱणी मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून भाईंदर पोलीसांनी दोन तरुणांना अटक केली आहे.
पीडित मुलगी १३ वर्षांची भाईंदरला राहते. १ जून पासून मुनव्वर मन्सुरी आणि अजीम मन्सुरी हे दोन तरुण तिच्याकडे पाहून अश्लील चाळे करून बोलण्याच्या प्रयत्न करत होते. १२ जून रोजी रात्री साडेआठच्या सुमारास मुन्नवर मन्सुरी (२०) याने तिला इमारतीच्या टॅरेसवर नेऊन तिचा विनयभंग केला, अशी तक्रार तिच्या आईने केली आहे. यानंतर त्यांनी या मुलीला बुरखा, चैन आणि अंगठी दिली आणि बुरखा घालून तयार राहण्यास सांगितले. बुरखा घालून ये आपण पळून जाऊन लग्न करू असे त्या मुलीला सांगितले. मात्र पीडित मुलीने त्याला नकार दिला. त्यानंतर मुनव्वर याने पीडित मुलीला नकली पिस्तुलाचा धाक दाखवून तू बुरखा घालून इस्लाम धर्म कबुल केला नाहीतर गोळ्या घालीन अशी धमकी दिली.
हा प्रकार पीडित मुलीने हा प्रकार तिच्या आईला सांगितल्यानंतर भाईंदर पोलीसांनी मुन्नवर अन्सारी (२०) आणि अजीम मन्सुरी (१८) या दोघांना विनयभंगाच्या कलम ३५४, ३५४ (अ) ५०६ तसेच पोक्सो कायद्याच्या कलम ८,१२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
आम्ही दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मात्र हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्याने त्याबाबत अधिक माहिती देता येणार नाही, असे भाईंदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुटराव पाटील यांनी सांगितले.