ठाणे : वरळी आणि वांद्रे मतदार संघात मदत व्हावी म्हणून आमचा बळी दिला गेला का असा सवाल करत भिवंडी पूर्वेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी बंड करणारे रुपेश म्हात्रे यांना आता काँग्रेसच्या आगरी नेत्यांची साथ मिळू लागली आहे. भिवंडी पश्चिमेत समाजवादी पक्षाने बंडखोरी केल्याने त्याचा निषेध म्हणून आम्ही रुपेश म्हात्रे यांच्या सोबत आहोत अशी घोषणा भिवंडी चे माजी खासदार आणि काँग्रेस नेते सुरेश तावरे यांनी केली आहे. या गोंधळामुळे महाविकास आघाडीत भिवंडीमध्ये मोठी फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२०१४ मध्ये आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुलगा कल्याण लोकसभेतून निवडून यावा यासाठी आम्हाला तेव्हा भिवंडीत कपिल पाटील यांचे काम करावे लागले. आता देखील तशीच परिस्थिती आहे. वांद्रे आणि वरळी मतदारसंघात मदत व्हावी यासाठी भिवंडी पूर्वेत समाजवादीचा उमेदवार देण्यात आला आहे. त्यांच्या राजकारणासाठी आमचा प्रत्येकवेळी बळी देण्यात आला आहे असा आरोप माजी आमदार तसेच भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघातील ठाकरे गटातील बंडखोर रुपेश म्हात्रे यांनी केला आहे. यामुळे भिवंडीतील राजकारण तापू लागले आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात भिवंडी पूर्वची जागा रईस शेख यांना सोडण्यात आली. असे असताना, भिवंडी पश्चिमेतही समाजवादी पक्षाने बंडखोरी केली आहे. या बंडखोर उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी स्वत: अबू आझमी आले. त्यामुळे पश्चिमेत काँग्रेस पक्षात नाराजीचा सुर उमटू लागला आहे. याठिकाणी काँग्रेस पक्षातून दयानंद चोरगे निवडणूक लढवत आहेत. काँग्रेस पक्षाशी समाजवादी पक्षाने बंडखोरी केल्याची भावना येथील कार्यकर्त्यांमध्ये पसरली आहे. यामुळे संतापलेले काँग्रेसचे नेते सुरेश तावरे यांनी भिवंडी पूर्वेतून उद्धव ठाकरेंचे बंडखोर उमेदवार रुपेश म्हात्रे यांना साथ देत असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे महाविकास आघाडीची डोके दुखी वाढली आहे.

हेही वाचा…कल्याण ग्रामीणमध्ये कोणाचा झेंडा घेऊ हाती? प्रचारातील गोंधळामुळे शिवसेना, भाजपमधील कार्यकर्ते संभ्रमात

काय म्हणाले रुपेश म्हात्रे

भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतून समाजवादी पक्षाचे रईस शेख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हा मतदारसंघ ठाकरे गटाला मिळावा यासाठी शिवसेनेचे माजी आमदार रुपेश म्हात्रे यांचा प्रयत्न होता. परंतु या मतदारसंघात रईस शेख हे आमदार असून त्यांना पुन्हा उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे रुपेश म्हात्रे यांनी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या मतदारसंघातून नुकतेच भाजपमधून शिंदे गटात प्रवेश केलेल्या संतोष शेट्टी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. दरम्यान, रुपेश म्हात्रे यांनी रईस शेख यांना उमेदवारी दिल्याने नाराजी व्यक्त केली आहे.

पक्षामध्ये बंडखोरी झाल्यानंतर अडीच वर्षांमध्ये पक्षाची एकजूट ठेवण्यासाठी आणि पक्षाला उभारी देण्यासाठी प्रयत्न केला. लोकसभेत आमच्यावर अन्याय झाला. विधानसभा निवडणूकीत देखील अन्याय होत असेल तर एकनिष्ठ राहण्याची मी घोडचूक केली आहे का? असे रुपेश म्हात्रे म्हणाले. २०१४ मध्ये आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुलगा कल्याण लोकसभेतून निवडून यावा यासाठी आम्हाला तेव्हा भिवंडीत कपिल पाटील यांचे काम करावे लागले. आता देखील तशीच परिस्थिती आहे. वांद्रे आणि वरळी मतदारसंघात मदत व्हावी यासाठी भिवंडीत समाजवादीचा उमेदवार देण्यात आला. त्यांच्या राजकारणासाठी आमचा प्रत्येकवेळी बळी देण्यात आला आहे. पक्षाने भिवंडीच्या बाबतीत नेहमी सावत्र वागणूक दिली आहे. यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी आणि आता उद्धव ठाकरे देखील हेच करत आहेत. कोणत्याही पक्षाने आम्हाला गृहीत धरू नये असेही ते म्हणाले.

हेही वाचा…साप चावलेल्या कल्याण ग्रामीण तालुकाप्रमुख महेश पाटील यांची सर्व पक्षीय नेत्यांकडून विचारपूस

काँग्रेसचे सुरेश टावरे म्हात्रे यांच्या मतदीला

भिवंडीचे काँग्रेसचे नेते सुरेश टावरे यांनी देखील रुपेश म्हात्रे यांच्या मदतीला आले. भिवंडी पूर्वेतून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून रईस शेख यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर पश्चिम मतदारसंघात काँग्रेसचे दयानंद चोरघे यांना उमेदवारी मिळाली आहे. परंतु पश्चिमेत समाजवादी पक्षाचे रियाज आझमी यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या प्रकारानंतर टावरे यांनी नाराजी व्यक्त करत पूर्वेतून म्हात्रे यांना मदतीचा हात दिला आहे. पूर्वेतून रईस शेख यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीतील घटक पक्ष म्हणून त्यांच्या मिरवणूकीत होतो. परंतु चोरघे यांचा अर्ज दाखल करताना दुसरीकडे समाजवादी पक्षाचे अबू आझमी हे रियाज यांच्या मिरवणूकीत होते. त्यामुळे या प्रकाराचा निषेध करण्यासाठी आम्ही म्हात्रे यांचा सोबत असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In bhiwandi east rupesh mhatre is rebelling against uddhav thackeray with support of agri leaders of congress sud 02