ठाणे : भिवंडी येथे पोक्सो प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर जमावाने दगडफेक करून हल्ला केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या हल्ल्यात पोलीस वाहनाच्या काचा फोडून वाहनाचे देखील नुकसान करण्यात आले आहे. याप्रकरणी ४० ते ५० जणांविरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भिवंडी येथील नारपोली पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात पिडीतेच्या आईचा जबाब नोंदविण्यासाठी पोलिसांचे पथक रुग्णालयात गेले होते. त्यावेळी रुग्णालयाबाहेर जमाव जमला होता. त्यामुळे जबाब घेणाऱ्या कर्मचाऱ्यांनी पोलीस पथकाला बोलावले. त्यानुसार, पोलीस उपनिरीक्षक आकाश पवार, पोलीस हवालदार शिंदे आणि पोलीस नाईक तडवी हे यांचे पथक रुग्णालयात गेले. परंतु त्यापूर्वी तो जमाव तेथून निघून गेला होता. त्यामुळे पोलिसांचे पथक या प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यासाठी निघाले होते. काही वेळानंतर वऱ्हाळदेवी मंदिर परिसरात २० ते २५ तरुण उभे असल्याचे पोलीस पथकाला आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी त्या जमावाला याबाबत विचारले असता, त्यांनी पोलिसांसोबत अरेरावी सुरू करत धक्काबुक्की करण्यास सुरूवात केली. त्यानंतर या ठिकाणी आणखी जमाव गोळा झाला. जमावाने पोलिसांना ‘आता परत कसे जाता पाहतो’ असे बालून धमकाविण्यास सुरूवात केली. त्यावेळी एका तरुणाने पोलीस नाईक तडवी यांच्या चेहऱ्यावर दगड फेकून मारला. त्यानंतर इतर जमावाने पवार,शिंदे आणि तडवी यांना धक्काबुक्की आणि त्यांच्या दिशेने दगडफेक करण्यास सुरूवात केली. पोलीस पथकाने घटनेची माहिती नारपोली पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर जमावाने पोलिसांचे शासकीय वाहनावर देखील दगड फेक करून वाहनाच्या काचा फोडल्या. याप्रकरणी सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम, १९८४ – ३ आणि भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ११०, १२१ (१), १२१(२), १३२, १८९ (२), १८९ (४), १९१ (२), ३२४ (६) अन्वये गुन्हा दाखल झाला असून जमावातील चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे.