ठाणे : भाजपने निवडणुक रोखेच्या माध्यमातून टोरंट पावर कंपनीकडून कोट्यावधी रुपये घेतले असल्यामुळेच भिवंडीत टोरंट कंपनीची दादागिरी वाढली आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी भिवंडीतील मेळाव्यात बोलताना केला. ‘चंदा दो, धंदा लो, चंदा दो, धंदा लो’ असे व्यापारी आणि बिल्डरधार्जीणी काम भाजपने केल्याचा आरोप करत देशातील नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या भाजपाला सामान्य नागरिक त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे. भाजप सरकारच्या काळात देशात गुंडगिरी व ड्रग्स माफिया वाढले आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा ) भिवंडी लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या निवडणूक प्रचारासाठी भिवंडीत शहरातील आम पाडा येथे शुक्रवारी सायंकाळी पक्षाच्यावतीने जाहीर मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाजपावर टिका केली. भिवंडीत टोरंट पावरचा मुद्दा गंभीर बनला आहे. भाजपने निवडणुक रोखेच्या माध्यमातून टोरंट पावर कंपनीकडून कोट्यावधी रुपये घेतले असल्यामुळेच भिवंडीत टोरंट कंपनीची दादागिरी वाढली आहे. करोना काळात रेमडीवीर औषध बनविणाऱ्या कंपनीने भाजपसाठी ८५ कोटी रुपयांचे निवडणुक रोखे खरेदी केल्याचे जगजाहीर झाल्यानंतर भाजप तोंडघशी पडली असून ‘चंदा दो, धंदा लो, चंदा दो, धंदा लो’ असे व्यापारी आणि बिल्डरधार्जीणी काम भाजपने केल्याचा आरोप करत देशातील नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या भाजपाला सामान्य नागरिक त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…कडवट शिवसैनिक म्हणतो…, आनंद दिघेनंतर आमदार संजय केळकर करताहेत निस्वार्थपणे काम
सर्वोच्च न्यायालयाने एसबीआयला फटकारल्यानंतर निवडणुक रोखे सारखा भाजप सरकारचा भ्रष्टाचार जनतेसमोर आला असून भाजप सरकारच्या काळात देशात गुंडगिरी व ड्रग्स माफिया वाढले आहेत. सगळ्यात जास्त ड्रग्स माफिया गुजरातमध्ये असून गुजरात सरकार त्यांना पाठीशी घालते, असा आरोपही त्यांनी केला. कपिल पाटील हे नेहमीच ३५ हजार कोटींचा विकास भिवंडी लोकसभेत केल्याच्या बाता करत असतात. मात्र भिवंडीचा विकास नेमकी कुठे झाला आहे हे त्यांनी दाखवून द्यावे, कपिल पाटील हे फक्त टक्केवारी खाणारे खासदार आहेत, असा गंभीर आरोप सुरेश म्हात्रे यांनी केला. खासदार झाल्यास टोरांट पॉवरला भिवंडीतून निश्चितच हद्दपार करणार असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.