ठाणे : भिवंडी येथील अंबाडी-भिवंडी रोडवर अन्न व औषध प्रशासनाच्या ठाणे विभागाने कोट्यवधी रुपयांचा प्रतिबंधित तंबाखू आणि पानमसाला जप्त केला आहे. याप्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतिबंधित पदार्थांची वाहतूक केल्याप्रकरणी वाहनाची नोंदणी प्रमाणपत्र तसेच वाहन चालकाचा वाहन परवाना रद्द करण्याबाबत प्रादेशिक परिवहन विभागात पत्रव्यवहार केला जाणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
हेही वाचा… ठाणे: खारेगाव खाडीपुलावरून खड्डेमुक्त प्रवास सुरु होणार ?
हेही वाचा… शेतकऱ्याच्या आक्रमक प्रतिकारामुळे बिबट्याने काढला पळ; शहापूर जवळील कसारा वन हद्दीतील प्रकार
आंबाडी-भिवंडी रोड येथील मडक्याचा पाडा परिसरात प्रतिबंधित पदार्थ मुंबई-ठाण्यात विक्रीसाठी आणला जात असल्याची माहिती ठाणे अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे, मंगळवारी सायंकाळी पथकाने परिसरात सापळा रचून एक टेम्पो अडविला. त्यावेळी या टेम्पोमध्ये पथकाला प्रतिबंधित पानमसाला आणि तंबाखू आढळून आला. हा साठा १ कोटी ८ लाख ९७ हजार ५२० रुपयांचा असल्याची माहिती पथकाने दिली. त्यानंतर पथकाने टेम्पो चालकाला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता, त्याचे नाव परमेश्वर ढाकरगे असल्याचे समोर आले. तसेच त्याने हा माल टेम्पोचा मालक, राजेश शेटीया, राजकुमार सपाटे, शौकत पठाण, राजेश गुप्ता यांनी सांगितलेल्या माहितीनुसार आणल्याची कबूली दिली. याप्रकारानंतर पथकाने भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याआधारे, परमेश्वर, टेम्पोमालक , राजेश शेटीया,राजकुमार, शौकत, राजेश गुप्ता यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतिबंधित पदार्थांची वाहतूक केल्याप्रकरणी वाहनाची नोंदणी प्रमाणपत्र तसेच वाहन चालकाचा वाहन परवाना रद्द करण्याबाबत प्रादेशिक परिवहन विभागात पत्रव्यवहार केला जाणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिली.