प्रत्येक निवडणुकीनंतर त्या त्या संस्थेतील सर्वोच्च पदावर जाण्यासाठी मोठी स्पर्धा असते. मग ते देशाचे पंतप्रधानपद असो वा ग्रामपंचायतीचे सरपंच पद. मात्र या सर्व जीवघेणी स्पर्धेला आणि घोडेबाजाराला रोखण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील अंबनाथ तालुक्यात असलेल्या ढोके दापिवली ग्रामपंचायतीने अनोखा मार्ग काढला आहे. ९ सदस्यसंख्या असलेल्या या ग्रामपंचायतीत दर सात महिन्यांनी सरपंच बदलला जातो. त्यामुळे प्रत्येक सदस्याला सरपंचपदावर विराजमान होण्याची संधी मिळते आहे. या ढोके दापिवलीच्या सरपंच पॅटर्नची चर्चा सध्या जिल्ह्यात पसरली आहे.

देशात पंचायतराज कायद्यामुळे ग्रामपंचायतींचे महत्व दाखवून दिले आहे. ग्रामपंचायत निवडणुका देशातील सर्वाधिक तणावाचा निवडणुका म्हणुनही ओळखल्या जातात. सर्वाधिक मतदार याच निवडणुकांमध्ये होते असे मानले जाते. या निवडणुकांनंतर सरपंच पदाची शर्यतही मोठी असते. मध्यंतरी थेट सरपंच निवडीच्या निर्णयामुळे चुरस गावागावांमध्ये पहायला मिळाली. नंतरच्या काळात पुन्हा सदस्यांमधून सरपंच निवडला गेल्याने घोडेबाजार पाहायला मिळाला. मात्र देशात असे कोणते गाव असेल का जेथे सामोपचाराने ग्रामपंचायत निवडणुकीत जिंकलेल्या प्रत्येक सदस्याला संरपंचपदाची संधी दिली जाते. तर ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यात असे एक गाव आहे ज्या गावात निवडून आलेल्या प्रत्येक ग्रामपंचायत सदस्याला सरपंचपदी विराजमान होण्याची संधी दिली जाते. बदलापूर शहराजवळ असलेली ढोके दापिवली ही ग्रामपंचायत सध्या आपल्या या निर्णयामुळे चर्चेत आहे. ढोके दापिवली, आंबेशिव खुर्द या ग्रामपंचायतीत निवडून आलेला प्रत्येक सदस्य सरपंच पदावर विराजमान होतो.

ग्रामपंचायतीत नऊ सदस्य आहेत. मात्र प्रत्येक सात महिन्यांनंतर येथील सरपंच राजीनामा देतो. त्यानंतर निवडून आलेल्या सदस्यांपैकी एकाची बिनविरोध सरपंचपदी निवड केली जाते. नुकतीच ढाके दापिवलीच्या सरपंचपदी माधुरी भोईर तर उपसरपंचपदी नितीन गायकर यांनी बिनविरोध निवड करण्यात आली. आतापर्यंत २१ महिन्यात या ग्रामपंचायतीत ३ सदस्यांनी सरपंच पद भुषवले आहे. स्थानिक आमदार किसन कथोरे यांच्या नेतृत्वात २५ वर्षांनंतर भाजपची सत्ता आल्याने त्यांच्या सल्ल्याने हा निर्णय घेतला असून तीन गावांच्या गृप ग्रामपंचायतीत प्रत्येक गावातील सदस्याला सरपंचपदाची संधी मिळत असल्याची माहिती हेमंत भोईर यांनी दिली आहे.