दिवा रेल्वे स्थानकात आज रेल रोको आंदोलन झाले. दरवाजा अडवून धरणाऱ्या महिलांच्या विरोधात महिला प्रवासी रुळावर उतरल्या व त्यांनी १० ते १५ मिनिटे जलद लोकलचा मार्ग रोखून धरला. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून १० ते १५ मिनिटे लोकल उशिराने धावत आहेत. रेल्वे पोलिसांनी समयसूचकता दाखवत वेळीच पावले उचलल्याने मोठे आंदोलन टळले.
गुरुवारी सकाळी लोकलमध्ये दरवाजा अडवून ठेवणाऱ्या महिलांमुळे अन्य महिला प्रवाशांना लोकलमध्ये चढता आलं नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी रुळावर उतरुन लोकल रोखली. रेल्वे पोलिसांनी लगेच पावले उचलत मध्यस्थी केल्यानंतर लोकल मुंबईच्या दिशेने रवाना झाली.
दिवा रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक चारवर हा प्रकार घडला. सकाळी ६.५६ ची जलद लोकल दिवा रेल्वे स्थानकात आली असता दरवाजा अडवून ठेवणाऱ्या महिला प्रवाशांमुळे अन्य महिलांना आत प्रवेश करता येत नव्हता. त्यावेळी या महिलांनी दरवाजावर उभ्या असलेल्या महिलांना खेचून बाहेर काढले. महिला प्रवासी रुळावर उतरल्या व त्यांनी लोकल रोखून धरली.
लोकल ट्रेनचा दरवाजा अडवून धरणाऱ्या महिला प्रवाशांच्या विरोधात दिवा स्थानकातील महिला रुळावर उतरल्या. या महिलांनी तब्बल १० मिनटं लोकल ट्रेन रोखून ठेवली होती.https://t.co/GBdBvlHcpK < येथे वाचा सविस्तर वृत्त@Central_Railway @rpfcr @RailMinIndia pic.twitter.com/1TKmRqt7QB
— LoksattaLive (@LoksattaLive) April 4, 2019
रेल्वे पोलिसांच्या मध्यस्थीनंतर या महिला रुळावरुन बाजूला झाल्या व लोकल मुंबईच्या दिशेने रवाना झाली. १० ते १५ मिनिट सुरु असलेल्या या आंदोलनामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करुन हे आंदोलन टाळले. पोलिसांच्या मधस्थीनंतर लोकल मुंबईच्या दिशेने रवाना झाली. याआधी सुद्धा दिवा रेल्वे स्थानकात झालेल्या आंदोलनाने नंतर भीषण रुप धारण केले होते.