बदलापूरः गुरूवारी रात्री अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे बदलापूर, अंबरनाथ शहरात एकच दाणादाण उडाली. दिवाळीच्या तोंडावर आलेल्या या पावसामुळे विक्रेते आणि खरेदीदारांची एकच धावपळ झाली. या पावसामुळे बदलापूर आणि अंबरनाथ शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या बॅरेज येथील जलशुद्धीकरण केंद्रावरील वीजपुरवठा खंडीत झाला. त्यामुळे बदलापूर आणि अंबरनाथ शहरांतील नागरिकांना ऐन दिवाळीच्या तोंडावर पाणी टंचाईला सामोेरे जावे लागले.
ठाणे जिल्ह्यातील जवळपास सर्वच शहरात सायंकाळच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, नवी मुंबई, कल्याण, शहापूर, मुरबाड अशा सर्वच शहरांमध्ये सायंकाळी सातच्या सुमारास पावसाला सुरूवात झाली. काही क्षणात विजांच्या कडकडाटात मुसळधार पाऊस कोसळला. दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडलेल्या अनेक नागरिकांची यावेळी धापवळ झाली. तर पणत्या, कंदील, रांगोळी यांसह दिवाळी सजावटीच्या साहित्याची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांचेही नुकसान झाले. सलग दोन तास पडलेल्या पावसाने ऐन दिवाळी ७० मिलीमीटर पावसाचा टप्पा गाठला.
खासगी हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी शहरातील सर्वाधिक पावसाची नोंद बदलापुरातच केली. या पावसामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडीत करण्यात आला होता. या पावसामुळे बदलापूर आणि अंबरनाथ शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या उल्हास नदीवरील बॅरेज बंधाऱ्यावरील वीज पुरवठाही खंडीत झाला. शुक्रवारी पहाटे ४ वाजता येथील एका जलशुद्धीकरण केंद्राचा वीज पुरवठा सुरळीत झाला. तर दुसऱ्या २४ दशलक्ष लीटर क्षमतेच्या प्रक्रिया केंद्राला वीज पुरवठा सायंकाळी उशिरापर्यंत सुरू झालेला नव्हता. त्यामुळे येथील पाणी पुरवठा १२ तासांपेक्षा अधिक काळ उलटूनही सुरू झालेला नव्हता. त्यामुळे शुक्रवारी सकाळी संपूर्ण बदलापूर आणि अंबरनाथ शहरातल्या बहुतांश भागात पाणी पुरवठा झाला नव्हता. त्यामुळे ऐन दिवाळीच्या सणात दोन्ही शहरात पाण्याचा ठणठणात होता. शनिवारीही दोन्ही शहरातील पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार असून लवकरात लवकर पाणी पुरवठा सुरळीत करण्याचा आमचा प्रयत्न असल्याची माहिती महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या बदलापुरच्या अभियंत्या माधुरी पाटील यांनी दिली आहे.
पावसाची आकडेवारी (मिमीमध्ये)
बदलापूर ७० मिमी
उल्हासनगर ५९
अंबरनाथ ५५
नवी मुंबई ३५
कल्याण ३२
पलावा २५
शहापूर २२
ठाकुर्ली २१
मुरबाड १९