डोंबिवली- डोंबिवली पश्चिमेतील ठाकुर्ली उड्डाण पुलाजवळील बावनचाळ भागात रेल्वे मैदानात एका अज्ञात व्यक्तिचा मृतदेह सोमवारी पोलिसांना आढळून आला होता. या मृत अज्ञात इसमाच्या मारेकऱ्याचा शोध घेण्यात विष्णुनगर पोलिसांना यश आले आहे. मृतापासून काही अंतरावर असलेल्या टोपीच्या माध्यमातून पोलिसांनी या खुनाचा गुन्हा उलगडला.

रेल्वे मैदानाच्या एका झाडाच्या कोपऱ्याला रक्ताच्या थारोळ्यात एक व्यक्ति पडली आहे, अशी माहिती विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव यांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहिले तर मृताच्या डोक्यावर लाकडी दांडक्याने प्रहार केले होते. बाजुला कपडे, टोपी पडली होती. पोलिसांनी रेल्वे मैदान भागातील सीसीटीव्ही चित्रिकरण तपासले. त्यामध्ये मयत व्यक्ति मैदानाच्या दिशेने पाण्याच्या बाटल्या घेऊन जात असताना दिसत होती.

मृतदेहा जवळील पडलेली टोपी घालणारा व्यक्ति सीसीटीव्ही चित्रिकरणात दिसत होता. त्याचा शोध पोलिसांनी घेतला. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अर्जुन आनंदा मोरे (३९) या बिगारी कामगाराला अटक केली.आरोपी हा कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा उर्दी गावचा रहिवासी आहे. तो रेल्वे मैदानात राहत होता.

पोलिसांनी सांगितले, मयत इसमाची ओळख अद्याप पटलेली नाही. मयताने भागशाळा मैदानातून क्रिकेट खेळणाऱ्या मुलांडून बिर्याणी रात्रीच्या भोजनासाठी आणली होती. तो रेल्वे मैदानात बसून ती खाणार होता. तेथे आरोपी अर्जुन आला. दोघांनी मद्यपान केले होते. अर्जुनने बिर्याणी खाण्यासाठी मागितली. मयताने त्यास नकार दिला. त्याचा राग येऊन अर्जुनने लाकडाचा दांडका घेऊन त्याचे प्रहार मयताच्या डोक्यात केले. यावेळी टोपीवाल्याने अर्जुनला रोखण्याचा प्रयत्न केला. मयताचा जागीच मृत्य झाला. अर्जुन, टोपीवाला तेथून पळून गेले. टोपीवाल्याला पकडल्यानंतर त्याने आरोपी भागशाळा मैदानात झोपला असल्याची माहिती दिली. पोलिसांनी त्याला तेथून अटक केली. दारूच्या नशेत आपण हे कृत्य केले असल्याची कबुली अर्जुनने पोलिसांना दिली, असे भालेराव यांनी सांगितले.

आरोपीला अटक करण्याच्या कारवाईत राहुलकुमार खिल्लारे, मोहन खंदारे, गणेश वडणे, कुलदीप मोरे, एम. बी. कपिले, के. पी. आंधळे, सुभाष नलावडे, मनोज सावंत हे अधिकारी शकील जामदार, कैलास घोलप, युवराज तायडे विक्रम गवळी, तुळशीराम लोखंडे, सचिन कांगुणे, संतोष कुरणे, तुषार कामोदकर यांनी सहभाग घेतला.

Story img Loader