डोंबिवली पूर्वेतील दावडी गावात एका महिलेची गळा दाबून हत्या केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. या महिलेची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह घरातीलच सोफा सेट मधील पोकळीत भरून ठेवला होता. या महिलेची हत्या कोणी व कशासाठी केली याचा तपास मानपाडा पोलिसांनी सुरू केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुप्रिया किशोर शिंदे असे मृत महिलेचे नाव आहे. मंगळवारी सकाळी सुप्रियाचे पती किशोर हे कामाला निघून गेले. दुपारी १२ वाजता मुलगा शाळेत निघून गेला. त्यानंतर सुप्रिया घरात एकट्याच होत्या. संध्याकाळी पती किशोर घरी आले, तेव्हा त्यांना पत्नी घरात नसल्याचे दिसले. त्यांनी शेजारी नातेवाईकांकडे शोध घेतला. ती कुठेच आढळून आली नाही. शोधाशोध करूनही पत्नी सापडत नसल्याने किशोर यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदणी करण्याचा निर्णय घेतला. ते मानपाडा पोलीस ठाण्यात पोहोचले. किशोर यांच्या शेजाऱ्यांना त्यांच्या घरातील सोफासेटची दिशा बदलली असल्याचे व त्याच्या आकारात बदल झाला असल्याचे दिसले. त्यांनी सोफासेट उघडून पाहिला असता त्यामध्ये सुप्रिया यांचा मृतदेह ठेवण्यात आला होता. हा प्रकार बघून शेजारी घाबरले. त्यांनी तातडीने पोलीस ठाण्यात गेलेल्या किशोर यांना घरी बोलावून घेतले.

पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी तत्काळ शिंदे यांच्या घरी आले. त्यांनी घर परिसरात असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये या प्रकारची माहिती मिळते का? त्याचा शोध सुरू केला आहे. सुप्रिया यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुक्मिणीबाई रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. ही हत्या नेमकी कोणी आणि कशासाठी की केली? याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In dombivali a woman was strangled to death and her body was hidden in a sofa msr