डोंबिवली मानपाडा येथील किणी चाळीतील एका खोलीमध्ये पोलिसांना रविवारी एका २६ वर्षीय महिलेचा मृतदेह सापडला. जयश्री मोजहार असे मृत महिलेचे नाव आहे. मृतदेह खूप खराब झालेल्या स्थितीमध्ये होता. शेजाऱ्यांनी जयश्री राहत असलेल्या खोलीमधून दुर्गंधी येऊ लागल्यानंतर पोलिसांना कळवले. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला तेव्हा जयश्री मृतावस्थेत सापडल्या. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार पोलिसांना या महिलेचा लिव्ह इन पार्टनर जितेंद्र सकपाळ (३०) याच्यावर संशय असून तो फरार आहे.
जयश्रीचे लग्न झाले होते. मात्र नवऱ्यापासून विभक्त झाल्यानंतर मागच्या दोन वर्षांपासून ती जितेंद्र सोबत राहत होती. आठवडयाभरापूर्वी जितेंद्रने जयश्रीला मारहाण केल्यामुळे तिने पोलिसांकडे धाव घेतली होती असे तपास करणाऱ्या पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी त्यावेळी इशारा देऊन जितेंद्रला सोडून दिले होते.
दोन ते तीन दिवसांपूर्वी आरोपीने धारदार शस्त्राने जयश्रीच्या डोक्यावर प्रहार केला. त्यामुळे तिचा मृत्यू झाला असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. जयश्रीच्या आईने केलेल्या तक्रारीवरुन आम्ही हत्येचा गुन्हा नोंदवून जितेंद्र सकपाळचा शोध सुरु केला आहे असे मानपाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुशील राऊत यांनी सांगितले.