डोंबिवली : मुंबईतील दादर भागात राहत असलेल्या एका जमीन मालकाची डोंबिवली जवळील आजदे गोळवली भागात ८५ गुंठे वडिलोपार्जित जमीन आहे. मागील ५० वर्षाहून अधिक काळ या कुटुंबीयांचा या जमिनीवर ताबा आहे. असे असताना या जमिनीवर आमचा कब्जा आहे. याठिकाणी तुमचा काही संबंध नाही अशी आक्रमक भूमिका घेत आजदे, गोळवली, दावडी गावातील दहा जणांनी मूळ जमीन मालकाला त्यांच्या आजदे गोळवलीतील जमिनीवर पाय ठेऊन विरोध केला आहे.
मानपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी मूळ जमीन मालकाने तक्रार केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. पोलीस ठाण्यातील तक्रारीत जमीन मालकाने म्हटले आहे, कल्याण शिळफाटा रस्त्यालगत आजदे गोळवली भागात ८४ गुंठे क्षेत्राची आमची वडिलोपार्जित जमीन आहे. आमच्या पूर्वजांनी ही जमीन ५० वर्षापूर्वी आजदे गोळवली भागात स्थानिकांकडून खरेदी केली आहे. आजदे, गोळवलीतील काही स्थानिकांनी ही जमीन भूमि अभिलेख विभागाकडून मोजून घेऊन ही जमीन आपल्या मालकीचा असल्याचा दावा भूमि अभिलेख विभागाकडे केला होता. या मोजणीला आम्ही मूळ मालक म्हणून विरोध केला होता.
जमीन हडप करण्याऱ्यांच्या विरुध्द मूळ मालकांनी न्यायालयात दावा दाखल केला होता. न्यायालयाने दोन्ही बाजु ऐकून घेऊन या जमिनीवर बेकायदा हक्क दाखविणाऱ्या आजदे, गोळवतीली ग्रामस्थांना या जमिनीशी त्यांचा काही हक्क नसल्याचे सांगत त्यांना त्या जमिनीवर येण्यास आणि मूळ मालकाला अडथळा आणण्यास विरोध केला होता. मूळ जमीन मालकांनी आपल्या आजदे गोळवली येथील जमिनीला संरक्षित भिंत बांधण्याचे काम गेल्या महिन्यात सुरू केले होते. त्यावेळी या जमिनीवर बेकायदा हक्क दाखविणाऱ्या आजदे, गोळवली, दावडीतील ग्रामस्थांनी ते काम बंद पाडले होते.
दादर येथील कुटुंबीयांनी आजदे गोळवली येथील जमिनीवर संरक्षित भिंत बांधण्यासाठी सात दिवसापूर्वी मजूर आणले. कंटेनर आणण्याची हालचाल केली. त्यावेळे तेथे दादर येथील जमिनीच्या मूळ मालकांच्या कुटुंबीयांना जमिनीवर कब्जा करणारे १० जण आणि त्यांचे इतर नऊ साथीदार यांनी बेकायदा जमाव जमवून शिवीगाळ करत मारण्याची धमकी देत त्या जमिनीवरून पिटाळून लावले. या जमिनीवर मूळ मालकाने पाय ठेऊ नये. त्यांना येण्याजाण्याचा मार्ग बंद करण्यासाठी जमिनीच्या पोहच मार्गावर काचा, पिंप टाकून रस्ता बंद करून टाकला, असे दादर येथील मूळ मालकाने मानपाडा पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे. दादर येथील मूळ जमीन मालकाने याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.