कल्याण : डोंबिवलीतील रामनगर पोलीस ठाणे हद्दीत एका नऊ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने फूस लावून पळवून नेले. तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिला सोडून दिले. आठ वर्षापूर्वी घडलेल्या या गुन्ह्याच्या प्रकरणात रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणातील दोषारोप सिध्द झाल्याने कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला २० वर्षाचा सश्रम कारावास आणि २० हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंड न भरल्यास एक महिने आणखी कारावास अशी शिक्षा ठोठावली.
शशिकांंत रामभाऊ सोनावणे असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. या गुन्ह्याचा तपास महिला साहाय्यक पोलीस निरीक्षक विद्या सूर्यवंशी यांनी करून आरोपी विरूध्द सबळ पुरावे उपलब्ध केले होते. कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात याप्रकरणी रामनगर पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले होते. आठ वर्ष याप्रकरणाची सुनावणी सुरू होती.
पोलीस ठाणे-न्यायालय समन्वयक म्हणून तेजश्री शिरोळे, बाबुराव चव्हाण, समन्स अंमलदार म्हणून संपत खैरनार, अरूण कोळी यांनी काम पाहिले. न्यायालयाने दोन्ही पक्षांची बाजू ऐकून आरोपीविरुध्द सबळ पुरावे उपलब्ध असल्याने शशिकांत रामभाऊ सोनावणे याला बुधवारी २० वर्ष सश्रम कारावास आणि २० हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, डोंबिवली पूर्व भागात राहत असलेला सुतारकाम करणारा एक कारागिर जुलै २०१७ मध्ये आपल्या घरा शेजारी मित्राच्या घरी वास्तशांतीसाठी कुटुंबीयांंसह चालला होता. जाण्याची तयारी झाल्यानंतर घरातील आपली नऊ वर्षाची मुलगी घरात नसल्याचे सुताराच्या निदर्शनास आले. त्यांना मुलगी आपल्या अगोदरच मित्राच्या घरी गेली असावी असे वाटले. तेथे गेल्यानंतर मुलगी तेथे नसल्याचे दिसले. सुताराने मुलाला मुलीचा शोध घेण्यास सांगितले. तिला मित्राच्या वास्तुशांती घरी घेऊन येण्यास सांंगितले. मुलगी तिच्या भावाला रात्रीच्या वेळेत घराच्या परिसरात आढळली. मुलाने तिला घरी आणले. भोजन झाल्यानंतर कुटुंबीय झोपी गेले.
हेही वाचा : बेकायदा पब, बारवर हातोडा; मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर ठाणे महापालिकेची अतिक्रमणविरोधी मोहीम तीव्र
दुसऱ्या दिवशी रात्री सर्व कुटुंबीय जेवणास बसले पण पीडित मुलगी भोजन करत नव्हती. तिला कारण विचारले तर ती काही बोलण्यास तयार नव्हती. त्यावेळी वडिलांना मुलीच्या अंगावर नखाचे ओरखाडे दिसले. आई, वडिलांना मुलीला काहीतरी झाले आहे असा संशय आला. तिला विश्वासात घेऊन विचारणा केली तेव्हा तिने आपल्या आईला सांगितले की काल रात्री आरोपी शशिकांत सोनावणे याने आपणास आंबेडकर पुतळ्याजवळून जबरदस्तीने उचलून नेले. बाजुच्या आंब्याच्या झाडाखाली आपल्यावर लैंगिक अत्याचार केले. आपण बचावासाठी ओरडा केला तर आपल्या तोंडात आरोपीने बोटे घातली. आपणास ५० रुपये देऊन हा प्रकार कोणास सांगू नकोस म्हणून दमदाटी केली. हा प्रकार ऐकून पीडित मुलीचे पालक हादरले. त्यांनी रामनगर पोलीस ठाण्यात आरोपी विरुध्द तक्रार केली. पोलिसांनी अपहरण, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल करून आरोपीला तात्काळ अटक केली होती.