कल्याण : डोंबिवली शहरातील मुख्य आणि अंतर्गत २७ रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाचे काम मुंबई प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे ऑक्टोबरनंतर हाती घेण्यात येणार आहे. ही कामे तातडीने सुरू करावीत, असे पत्र सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी ‘एमएमआरडीए’च्या वरिष्ठांना दिले आहे. ही कामे तातडीने सुरू करण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला आहे. या कामांसाठी मंत्री चव्हाण यांनी काही महिन्यांपूर्वी शासनाकडून ३७२ कोटीचा निधी मंजूर करुन घेतला आहे.
या २७ कामांची निविदा प्रक्रिया ऑक्टोबरपर्यंत पूर्ण केली जाईल. या कामाचे ठेकेदार निश्चित झाल्यानंतर तातडीने ही कामे हाती घेण्यात येणार आहेत, असे प्राधिकरणाच्या अधिकाऱ्याने सांगितले. विस्तारीत मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पांतर्गत शासनाने या कामांना मंजुरी दिली आहे. या कामांमधील पाच कोटीपेक्षा अधिकच्या खर्चाची कामे एमएमआरडीए आणि पाच कोटींपेक्षा कमी खर्चाची रस्ते कामे पालिकेकडून केली जाणार आहेत, असे अधिकारी म्हणाले. ही रस्त्याची कामे पूर्ण होण्यासाठी पालिकेने या रस्त्यांचा ८० टक्के ताबा आपल्याकडे असल्याची माहिती प्राधिकरणाला द्यावी. केंद्र आणि राज्य शासनाच्या इतर कोणत्या संस्थांनी या रस्त्यांसाठी यापूर्वी काम केले नाही, अशी सविस्तर माहिती प्राधिकरणाने कडोंमपाकडे मागील वर्षी डिसेंबरमध्ये मागितली आहे.
हेही वाचा : धुळीकणांनी कल्याण-डोंबिवलीतील नागरिक हैराण
गेल्या महिन्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी ३७२ कोटीच्या निधीतील डोंबिवलीतील रस्ते कामे तातडीने सुरू करण्याची मागणी प्राधिकरणाला केली आहे. प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता अ. ब. धाबे यांनी पालिका आयुक्तांना पत्र पाठवून या रस्ते कामासाठीच्या अत्यावश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी केली आहे. रस्ते कामाचा निधी चव्हाण यांनी गटार, पायवाटा, जीम, स्कायवाॅक छत अशा किरकोळ कामांसाठी न देता शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवर खर्च करण्याची नागरिकांची मागणी आहे.
हेही वाचा : ठाणे : बंदूकीतून गोळी झाडत पत्नीची हत्या
कलगीतुऱ्यातील निधी
राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असताना अडीच वर्षापूर्वी मंत्री चव्हाण यांनी डोंबिवलीतील रस्ते कामांसाठी ३७२ कोटीचा निधी मंजूर करुन घेतला. त्यानंतर राज्यातील सरकार बदलले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे सरकार स्थापन झाले. मंत्री चव्हाण यांनी डोंबिवली शहरासाठी मंजूर केलेला ३७२ कोटीचा निधी मुक्त करावा म्हणून तत्कालीन नगरविकास मंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तगादा लावला. त्यावेळी चव्हाण आणि मुख्यमंत्री सुपुत्र खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्यातून धुसफूस होती. मनातून इच्छा नसताना पुत्रप्रेमापोटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चव्हाणांचा रस्ते कामाचा निधी रोखुन धरला.
हेही वाचा : इन्स्टाग्रामवरील चर्चेचा जाब विचारल्याने डोंबिवलीत पत्नीची आत्महत्या
या विषयावरुन मंत्री चव्हाण यांनी सत्तापदी येईपर्यंत मुख्यमंत्री पिता-पुत्रावर विविध माध्यमातून टीकास्त्र सोडले. शिवसेनेतून फुटल्यानंतर एकनाथ शिंदे यांना सत्तास्थानी विराजमान करेपर्यंत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशावरुन मंत्री चव्हाण यांनी महत्वाची भूमिका बजावली. ही जाण ठेऊन खासदार पुत्राला शांत करुन मुख्यमंत्री शिंदे यांनी चव्हाण यांच्या प्रयत्नातील डोंबिवलीतील रस्ते कामांचा निधी दोन महिन्यापू्वी मोकळा केला. “डोंबिवलीतील काँक्रीटीकरणाची २७ कामे हाती घेण्यासाठी पालिकेला अत्यावश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याचे कळविले आहे. ऑक्टोबरनंतर ही कामे सुरू केली जातील.”, असे एमएमआरडीएचे अधीक्षक अभियंता अ. ब. धाबे यांनी म्हटले आहे.