डोंंबिवली – डोंबिवली पश्चिमेतील गोपीनाथ चौक ते जगदांबा माता मंदिरपर्यंच्या पोहच सीमेंट काँक्रीट रस्त्याचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून करण्यात येणार आहे. हा रस्ता टिटवाळा, कल्याण ते डोंबिवली, २७ गाव बाह्यवळण रस्त्याला जोडणारा आहे. गोपीनाथ चौक ते जगदांबा माता मंदिर या सुमारे ५०० ते ६०० मीटरच्या रस्त्याच्या दुतर्फा सुमारे ६८ झाडे आहेत. ही झाडे तोडण्यासाठी एमएमआरडीएने कल्याण डोंबिवली पालिकेच्या उद्यान विभागाकडे परवानगी मागितली आहे.

पालिकेच्या उद्यान विभागाने एमएमआरडीएच्या प्रस्तावाप्रमाणे प्राधिकरणाकडून प्रती झाड शुल्क आणि तोडण्यात येणाऱ्या प्रती झाड सुमारे २५ झाडे लावण्यासाठीचा प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावाप्रमाणे कल्याण डोंबिवली पालिकेच्या उद्यान विभागाचे उपायुक्त संजय जाधव यांच्या स्वाक्षरीने गोपीनाथ चौक ते जगदंंबा माता मंदिर रस्त्यावरील झाडांवर झाडे तोडण्यासाठी कोणाची हरकत, सूचना असेल तर आपली नोंद पालिकेत करावी, यासाठी जाहीर नोटीस प्रसिध्द केली आहे. प्रत्येक झाडाच्या खोडांवर या नोटिसा लावण्यात आल्या आहेत.

डोंबिवली परिसरातील पॅकेज पाच अंतर्गत विविध रस्त्यांची कामे करायची आहेत. या रस्ता रूंदीकरण आणि रस्ते बांधकामात एकूण ६८ झाडे बाधित होणार आहेत. ही झाडे तोडणे किंवा योग्य झाडांचे पुनर्रोपण करण्याची परवानगी एमएमआरडीएच्या कार्यकारी अभियंत्यांनी पालिकेकडे मागितली आहे. ही झाडे तोडण्यास कोणाची काही हरकत असेल तर त्यांनी सात दिवसाच्या आत आपली हरकत पालिकेच्या उद्यान आणि वृक्ष प्राधिकरण समितीसमोर लेखी स्वरुपात मांडावी. मुदतीत हरकती दाखल न केल्यास सदरची झाडे तोडणे, पुनर्रोपणास परवानगी देण्यात येईल, याची संबंधितांनी दखल घ्यावी, असे जाहीर नोटिसमध्ये म्हटले आहे.

तोडण्यात येणाऱ्या झाडांमध्ये नारळ, आंंबा, पेरू, रानचिंच, जांभुळ, फणस अशा प्रकारच्या झाडांचा समावेश आहे. भाजपचे प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते या रस्ते कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. हा महत्वपूर्ण रस्ता मार्गी लागणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. गोपीनाथ चौक ते जगदांबा माता मंदिर, गरीबाचापाडा ते अनमोल नगरी वळण पोहच रस्ता, कुंभारखाणपाडा ते वळण रस्ते, सत्यवान चौक ते स्मशानभूमी हे बाह्य वळण रस्त्याला जोडणारे डोंबिवली पश्चिमेतील पोहच रस्ते आहेत. या पोहच रस्त्यांमुळे येत्या दोन वर्षात डोंंबिवली पश्चिमेतील वाहन चालकांना डोंबिवली पूर्व, रेल्वे स्थानक भागात न येता वळण रस्त्याने कल्याण, भिवंडी, ठाण्याकडे जाणे शक्य होणार आहे.

डोंबिवली पश्चिमेत पॅकेज पाच अंतर्गत गोपीनाथ चौक ते जगदंबा माता मंदिर पोहच रस्त्यामध्ये ६८ झाडे बाधित होत आहेत. या झाडांना तोडण्याची परवानगी देण्यापूर्वी नागरिकांकडून हरकती मागवण्यासाठी झाडांना नोटिसा लावल्या आहेत. बाधित झाडांसंदर्भात आवश्यक ती कार्यवाही एमएमआरडीएकडून करून घेऊन रितसर झाडे तोडण्याची परवानगी देण्यात येणार आहे.- महेश देशपांडे, अधीक्षक, उद्यान विभाग, डोंबिवली