डोंबिवली : ऑनलाईन माध्यमातून कूट चलनातून समभाग गुंतवणूक केली तर आपणास झटपट अधिकचा परतावा मिळेल असे आमिष दाखवून चार भामट्यांनी डोंबिवली जवळील पलावा, २७ गावातील नांदिवली, निळजे, आडिवली, देसलेपाडा, दिवा परिसरातील एकूण सात जणांची एकूण ७३ लाखाहून अधिक रूपयांची फसवणूक केली आहे. एका नोकरदाराची एकट्याची ४७ लाखाची या गुंतवणूक प्रकरणात फसवणूक झाली आहे.
गेल्या पंधरा दिवसाच्या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे. गेल्या महिन्यात पलावा भागात राहत असलेल्या रिलायन्स कंपनीत नोकरीला असलेल्या नोकरदाराला घरी असताना समभाग गुंतवणुकीविषयी एक जाहिरात समाज माध्यमातून पाहण्यास मिळाली. त्या जाहिरातीला ऑनलाईन माध्यमातून प्रतिसाद देताच त्यांना आपण कूट चलनातून समभाग गुंतवणुकीसाठी इच्छुक आहात का, असे प्रश्न करून, आपणास गुंतवणुकीसाठी सर्व सहकार्य मिळेल, असे आश्वासन देण्यात आले.
या नोकरदाराप्रमाणे इतर गुंतवणूकदारांना चार भामट्यांनी विविध प्रकारच्या जुळण्या पाठवून, या गुंतवणूकदारांची व्यक्तिगत, बँक व्यवहारांची माहिती मागवून घेऊन त्यांना टप्प्याने ऑनलाईन माध्यमातून भामट्यांनी दिलेल्या बँक खात्यावर रक्कम वळती करण्यास लावली. अल्प कालावधीत अधिकचा परतावा मिळत असल्याने तक्रारदार नोकरदाराने ४७ लाख ४७ हजार रूपये कूट चलन समभागासाठी गुंतवले. या रकमेवर त्यांना ऑनलाईन माध्यमातून एक कोटीहून अधिकचा परतावा दिसू लागला. हा परतावा काढून घेण्यासाठी नोकरदाराने प्रयत्न केले. त्यांना सेवा छाननी शुल्क म्हणून १६ लाखाहून अधिकची रक्कम भरणा करण्यास भामट्यांनी सांगितली.
ही रक्कम भरणा केल्यानंतरही ऑनलाईन माध्यमातून पैसे परत मिळत नव्हते. नोकरदाराने पुन्हा ग्राहक सेवा कक्षाला संपर्क केला. तेव्हा त्यांना कार्मिक सेवा शुल्कासाठी २० लाखाहून अधिकची रक्कम भरण्यास सांंगण्यात आले. हा प्रकार पाहून आपण फसलो असल्याची जाणीव नोकरदाराला झाली. त्यांनी सायबर गुन्हे कक्षाकडे त्यानंतर मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलीस ठाण्यात अशाप्रकारची तक्रार करण्यासाठी इतर सहा गुंतवणूकदार आल्याचे त्यांना समजले. या गुंतवणूकदारांनी ९५ हजार ते ३ लाखापर्यंतची गुंतवणूक कूटचलन समभाग गुंतवली होती. या सहा गुंतवणूकदारांची एकूण सुमारे २५ लाखाहून अधिक रूपयांची फसवणूक झाली आहे. अशी एकूण ७३ लाखाहून अधिकची फसवणूक भामट्यांनी डोंबिवली जवळील नांदिवली, पलावा, आडवली, निळजे, देसलेपाडा, दिवा, भोपर भागातील नागरिकांची केली आहे. मानपाडा पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्याने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.