डोंबिवली : रिअल इस्टेट व्यवसायातील एक महिला आणि तिच्या पतीला डोंबिवलीतील एका इसमाने तलवारीचा धाक दाखवून मारण्याचा प्रयत्न केला. या पती, पत्नीच्या बचावासाठी इतर नागरिक पुढे आले, त्यावेळी इसमाने मध्ये कोणी आले तर त्यांना तलवारीने मारून टाकीन अशी भाषा करून परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण केले.
डोंबिवली पूर्वेतील दावडी गावातील धनलक्ष्मी एकविरा सोसायटीच्या जवळ हा प्रकार घडला आहे. या झटापटीत इसमाने महिलेचा विनयभंग केला आहे. सुरेंंद्र पाटील असे तलवार घेऊन दहशत पसरविणाऱ्या इसमाचे नाव आहे. तो डोंंबिवलीत राहतो. एक २५ वर्षाची महिला घर खरेदीदारांना सदनिका दाखवून खरेदी व्यवहार पूर्ण झाला तर त्या माध्यमातून मिळणाऱ्या कमिशनमधून उपजीविका करते. ही महिला दावडी भागात राहते.
हेही वाचा… भटक्या श्वानाचा संशयास्पद मृत्यू, वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
ही महिला आपल्या घराच्या समोरून शुक्रवारी दुपारी पायी चालली होती. त्यावेळी आरोपी सुरेंद्र पाटील याने या महिलेकडे पाहून तु मला आवडतेस, तु माझ्या सोबत चल, अशी टिपणी केली. या महिलेला काही कळण्याच्या आत तिचा विनयभंंग केला. या प्रकाराने महिलेने सुरेंंद्र पाटील यास प्रतिकार केला. त्यावेळी आरोपी सुरेंद्र पाटील याने आपल्या व्हॅगनाॅर वाहनातून तलवार बाहेर काढून पीडित महिलेला जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
पत्नीला धमकावले जात आहे हे पाहून तिच्या बचावासाठी तिचा पती धाऊन आला. त्यावेळी आरोपी पाटीलने त्यालाही बेदम मारहाण करून जमिनीवर पाडले.
पाटीलच्या हातात तलवार असल्याने तो आपल्या पतीला मारून टाकील म्हणून महिलेने आरडाओरडा करून परिसरातील नागरिकांना मदतीसाठी पुढे येण्याची मागणी केली. त्यावेळी सुरेंद्र पाटील याने हवेत तलवार फिरून पती, पत्नीच्या बचावासाठी कोणी पुढे आले तर त्याला जिवंत सोडणार नाही, असे बोलून दहशतीचे वातावरण निर्माण केले. पीडित महिलेच्या बचावासाठी जे नागरिक पुढे येत होते, त्यांंच्या अंंगावर तलवार घेऊन धावत जाऊन परिसरात भीतीचे वातावरण निर्माण केले.
हेही वाचा… ठाण्यात खड्ड्यांचे विघ्न, पावसात मुख्य मार्गावर वाहतूक कोंडी; दुचाकीस्वारांचा प्रवास धोकादायक
या महिलेच्या तक्रारीवरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पाटील याने तलवार कोठुन आणली होती. ती त्याने त्याच्या वाहनात कोणत्या कारणासाठी ठेवली होती. त्याचा काही तो दुरुपयोग करणारा होता का, अशा अनेक बाजुने पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.