लोकसत्ता खास प्रतिनिधी
डोंबिवली: कल्याण-ठाकु्र्ली रेल्वे स्थानकांच्या दरम्यान रेल्वे रुळांजवळ रेल्वेच्या खांबाला लावण्यात आलेला एक दिशादर्शक लोकल मधील प्रवाशांना इजा करण्याच्या स्थितीत होता. लोकलच्या दरवाजात उभे राहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी हा टोकदार लोखंडी दिशादर्शक धोकादायक असल्याने तो काढून टाकण्याची मागणी प्रवाशांकडून अनेक महिन्यांपासून रेल्वे अधिकाऱ्यांकडे केली जात होती.
या विषयी प्रवाशांनी रेल्वेच्या स्थानिक, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या होत्या. त्याची दखल घेतली जात नव्हती. ‘लोकसत्ता’ने या विषयीचे वृत्त प्रसिध्द करताच रेल्वे प्रशासनाने या लोखंडी दिशादर्शकाची गंभीर दखल घेतली. तातडीने ठाकुर्ली रेल्वे स्थानका जवळ कचोरे गाव हद्दीत गावदेवी मंदिर भागात रेल्वे रुळाजवळ असलेला टोकदार लोखंडी दिशादर्शक रेल्वे कामगारांनी हटविला.
हेही वाचा… ठाणे : मानपाडा चौकातील टायटन रुग्णालयाजवळ भीषण आग, आगीमुळे घोडबंदर मार्गावर वाहतूक कोंडी
अनेक प्रवासी दरवाजाला लटकून प्रवास करतात. गर्दीच्या वेळेस प्रवाशांची लोकलच्या दरवाजात घोळक्याने गर्दी असते. अशा वेळी बेसावध असलेल्या प्रवाशांना या टोकदार दिशादर्शकाचा फटका बसून मोठा अपघात होण्याची शक्यता प्रवासी वर्तवित होते.