डोंबिवली – डोंबिवलीमधील एका ७२ वर्षांच्या चहा विक्रेत्याला त्रिमूर्तीनगर झोपडपट्टीतील गुंंडांनी मंगळवारी दिवसाढवळ्या दादागिरीचा अवलंंब करून लुटल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. चहा विक्रेत्याने याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
कल्याणमध्ये आंंबिवली जवळील इराणी वस्तीत जसे काही अट्टल चोर राहतात. त्याप्रमाणे मागील काही वर्षांपासून डोंबिवलीतील त्रिमूर्तीनगर झोपडपट्टीत अनेक गुन्ह्यातील आरोपी याठिकाणी चोऱ्या करून वास्तव्याला येतात. सर्वाधिक चोरटे पोलिसांनी या वस्तीमधून पकडले आहेत. त्यामुळे त्रिमूर्तीनगर झोपडपट्टीच्या प्रवेशव्दारावर पोलीस चौकी सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. यासंदर्भात नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना एक निवेदन देण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा – केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा
गुलाबी पुजारी (७२) असे चहा विक्रेत्याचे नाव आहे. शिळफाटा रस्त्यावरील गोळवली गाव हद्दीत ते चहा विक्रीचा व्यवसाय करतात. गणराज सुरेश छपरवाल (२५) आणि अन्य एक जण अशी आरोपींची नावे आहेत. ते डोंबिवलीतील शेलार नाक्यावरील त्रिमूर्तीनगर झोपडपट्टीत राहतात.
पोलिसांनी सांगितले, गुलाबी पुजारी हे मंगळवारी सकाळी गोळवली येथील आपल्या चहा विक्रीच्या दुकानात चहा विक्रीचा व्यवसाय करत होते. दुकानात सकाळची वेळ असल्याने किरकोळ गर्दी होती. यावेळी दुकानात आरोपी गणराज छपरवाल आणि त्याचा ३० वर्षांचा साथीदार आला. ते चहा पिण्यासाठी आले असावेत म्हणून गुलाबी पुजारी याने त्यांना बसण्यास सांगितले. पण त्यांनी चहा न घेता आम्हाला पिण्याच्या पाण्याची बाटली पाहिजे अशी मागणी केली.
हेही वाचा – इन्स्टाग्रामवरील ओळखीतून डोंबिवलीतील महिलेच्या घरात भामट्याकडून चोरी
गुलाबी मंचकावरून पाण्याची बाटली काढत असताना अचानक आरोपी गणराज छपरवाल याने चहा विक्रेता गुलाबी यांच्या मानेवर थाप मारून त्यांच्या गळ्यातील ९० हजार रुपये किमतीची सोन्याची साखळी हिसकावली. काही कळण्याचा आत हा प्रकार घडला. सोन्याची साखळी हातात येताच गणराजसह त्याचा साथीदार तेथून पळून गेले. मानेला हिसका का बसला म्हणून पुजारीने मानेला हात लावला तर सोनसाखळी गायब असल्याचे दिसले. गुलाबीने चोर म्हणून ओरडा केला, पण तोपर्यंत आरोपी त्या भागातून गायब झाले होते. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप गोरे या प्रकरणाचा तपास करत आहेत.