डोंंबिवली – कल्याण डोंबिवली पालिकेच्या डोंबिवलीतील फ प्रभागाने मुख्य वर्दळीच्या रस्त्यांवरील अनेक महिन्यांपासून रस्ते वाहतुकीला अडथळा ठरणारी बेवारस भंगार वाहने जप्त करण्याची मोहीम सुरू केली आहे. ९० फुटी रस्त्यांवरील अनेक बेवारस भंगार वाहने अडथळा येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यावर फ प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी ही सर्व वाहने जप्त करून पालिकेच्या खंबाळपाडा येथील भंगार तळावर नेऊन ठेवली आहेत.
पालिका हद्दीतील सर्व मुख्य, अंतर्गत रस्ते वाहतुकीसाठी मोकळे पाहिजेत. या रस्त्यांवर फेरीवाला किंवा बेवारस वाहने असता कामा नयेत असे आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांचे सर्व प्रभाग साहाय्यक आयुक्तांना आदेश आहेत. ठाकुर्लीतील ९० फुटी या वर्दळीच्या रस्त्यावर अनेक महिन्यांपासून भंगार दुचाकी, चारचाकी, रिक्षा ही वाहने बेवारस स्थितीत होती. ही वाहने वाहतुकीला अडथळा येत होती.
या बेवारस वाहनांच्या वाढत्या तक्रारी फ प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांच्याकडे आल्या होत्या. या बेवारस स्थितीमधील वाहनांचा फ प्रभाग कर्मचाऱ्यांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, एकही वाहन मालक आढळून आला नाही. साहाय्यक आयुक्त मुंबरकर यांच्या उपस्थितीत ही सर्व वाहने दोन दिवसापूर्वी जप्त करून हायड्राच्या साहाय्याने ट्रकमध्ये भरून पालिकेच्या खंबाळपाडा भंगार वाहनतळावर जमा करण्यात आली. अतिक्रमण नियंत्रण पथकाचे कर्मचारी या कारवाईत सहभागी झाले होते.
डोंबिवलीतील ब्राह्मण सभेजवळील टिळक रस्ता ते आगरकर रस्ता जोडणारा रस्ता पालिकेने रूंदीकरण करून सीमेंट काँक्रीटचा केला आहे. या रस्त्यावर परिसरातील नागरिक आपली चारचाकी दुचाकी वाहने रस्त्याच्या दुतर्फा उभी करून ठेवत आहेत. या रस्त्यावरून येजा करणाऱ्या वाहनांना रस्त्याच्या दुतर्फा उभ्या केलेल्या वाहनांचा अडथळा होत असल्याने फ प्रभागाने वाहतूक विभागाच्या साहाय्याने हा रस्ता मोकळा करण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
डोंबिवलीत फ प्रभाग हद्दीतील अनेक वर्दळीच्या रस्त्यांवर बेवारस स्थितीत वाहने उभी आहेत. काही वाहने वर्षानुवर्ष एकाच जागी उभी आहेत. त्या ठिकाणी सफाई कामगारांना स्वच्छता करता येत नाही. त्यामुळे फ प्रभाग हद्दीतील सर्व वर्दळीच्या रस्त्यावरील बेवारस वाहने उचलण्याची मोहीम सुरू करण्यात येणार आहे.
हेमा मुंबरकर, साहाय्यक आयुक्त, फ प्रभाग, डोंबिवली.