डोंबिवली : येथील पश्चिमेतील उमेशनगर मधील पोलीस चौकी जवळील वर्दळीच्या रस्त्यावरील एका मुख्य जलवाहिनीवरील व्हाॅल्व्हवर झाकण नाही. रस्त्याच्या मध्यभागी रस्त्याला समतल खालच्या भागात व्हाॅल्व्हची सहा इंचाची जलवाहिनी उघडी आहे. ही जलवाहिनी अनेक पादचाऱ्यांच्या लक्षात येत नसल्याने त्यांचा पाय मुरगळून अपघात होत आहेत. उमेशनगर मधील रेतीबंदर रोड नाका येथे मासळी, भाजीपाला बाजार आहे. परिसरातील नागरिक याठिकाणी खरेदीसाठी येतात. व्हाॅल्व्ह नसलेल्या भागात अनेक पादचारी, शाळकरी मुलांचे पाय अडकुन मुरगळत आहेत.
दररोज या जलवाहिनीमध्ये पाय अडकून चार ते पाच नागरिक पडत असतात. या भागातील एक व्यावसायिक अब्बु खान हे सकाळच्या वेळेत उमेशनगर रेतीबंदर रोड चौकातून जात होते. त्याचा याठिकाणी अपघात झाला. पादचाऱ्यांनी त्यांचा जलवाहिनीमध्ये अडकलेला पाय बाहेर काढला. त्यांच्या पायाला गंंभीर दुखापत झाली आहे. या जलवाहिनीच्या व्हाॅल्व्हवरील मोकळ्या पाईपवर झाकण बसवावे, अशी मागणी येथील सिंधुदुर्ग जिल्हा उत्सव समितीचे संस्थापक विद्याधर दळवी यांनी पालिकेच्या साहाय्यक आयुक्तांकडे केली आहे.
पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाची ही जबाबदारी आहे. ह प्रभागात आता पाणी पुरवठा विभागात नवीन अधिकारी दाखल झाले आहेत. त्यामुळे त्यांचे या विषयाकडे लक्ष नसल्याचे समजते. पाणी पुरवठा विभागाचा व्हाॅल्व्हमन दररोज याठिकाणी जलवाहिनीवरील व्हाॅल्व्ह चावीने उघडून पाणी सोडण्यासाठी येतो, त्यांना याठिकाणी झाकण नाही. हे माहिती असुनही संबंधित व्हाॅल्व्हमन या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष का करतो, असे प्रश्न रहिवासी करत आहेत. अनेक नागरिकांनी संबंधित व्हाॅल्व्हमनला झाकण बसविण्याची मागणी केली असल्याचे समजते. पाणी पुरवठा अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेण्याची मागणी दळवी यांनी केली आहे.