डोंबिवली – आमच्या खासगी मालकीच्या जागेवर का उभा राहिला, असा प्रश्न करून डोंबिवलीजवळील दावडी गावातील मिलिंद नाथा ठाकरे (३५) या इसमाने एका औषध विक्री व्यवसायातील तरुणाला बेदम मारहाण, शिवीगाळ केली. या तरुणाच्या अंगावर मोटार कार घालून त्याला काही मीटर अंतरावर फरफटत नेऊन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. शनिवारी रात्री दावडी गावातील शिवमंदिर जानूनगर भागात ही घटना घडली.
संजय हरिश्चंद्र यादव (२७) असे औषध विक्री व्यवसायातील तरुणाचे नाव आहे. तो दावडी गावात राहतो. मिलिंद ठाकरे असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले, संजयला सर्दी झाल्याने तो शनिवारी रात्री सर्दीची गोळी खरेदीसाठी मित्र शरद यादवसह औषध दुकानात चालला होता. तो गप्पा मारत काही वेळ एके ठिकाणी थांबला. तेथे आरोपी मिलिंद ठाकरे आले. त्यांनी ही माझी खासगी जमीन आहे. येथे तुम्ही थांबू नका, असे सांगून त्यांना जाण्यास सांगितले. मिलिंद यांच्या बोलण्यानंतर तक्रारदार संजय आणि त्याचा मित्र सार्वजनिक रस्त्यावर येऊन गप्पा मारू लागले.
हेही वाचा – उद्योगधंद्यांच्या वाढीसाठी सरकारचे प्रोत्साहन; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
यावेळी आरोपी मिलिंद स्वत:ची वॅगनाॅर मोटार घेऊन समोरून वेगाने आला. त्याने संजय आणि त्याच्या मित्राला बेदम मारहाण केली. संजयला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. हा सगळा प्रकार पाहून संजय व त्याचा मित्र चक्रावले. आम्ही आपणास काही केले नाही तरी तुम्ही का आम्हाला मारता, असे प्रश्न यादव बंधू करत होते. त्याचा राग मिलिंदला आला. त्यांनी स्वत:च्या ताब्यातील मोटार जोराने संजय यादव याच्या अंगावर घातली. आपल्या जीवाला धोका आहे म्हणून संजय रस्त्याने पळू लागले. त्यावेळी मिलिंद ठाकरे यांनी पळत असलेल्या संजयच्या पाठीमागून सुसाट वेगाने मोटार चालवली आणि संजयला जोराची धडक दिली. या धडकेत संजय रस्त्यावर पडले. संजय गाडीखाली पडला आहे हे माहिती असूनही, इतर पादचारी मिलिंंद यांना मोटार थांबविण्यासाठी ओरडत असताना आरोपी मिलिंदने वेगाने मोटार चालवून संजय यादवला मोटारीखाली चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा – ठाणे : भटक्या श्वानाचा मारहाणीत मृत्यू ,क्रिकेटच्या फळीने डोक्यात मारहाण
संजयच्या पायावरून चाक गेल्याने आणि हात, पायाला दुखापत झाल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस उपनिरीक्षक एस. पी. काळदाते याप्रकरणाचा तपास करत आहेत. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.