डोंबिवली : ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचे शिवसैनिकांच्या हद्यातील स्थान ओळखून यावेळी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या प्रचारपत्रकांंवर आनंद दिघे यांची प्रतिमा ठळकपणे महायुतीच्या इतर नेत्यांसोबत प्रसिध्द करण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यापूर्वी या प्रसिध्दीपत्रकाच्या जागेवर पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, युवा नेते आदित्य ठाकरे यांचे स्थान असायचे. शिवसेनेच्या फुटीनंतर या दुसऱ्या फळीच्या जागा आता रिक्त झाल्या आहेत. या जागेत आता आनंद दिघे यांना स्थान देण्यात आले आहे. यापूर्वी ठाकरे घरातील प्रतिमांंमुळे आनंद दिघे यांची प्रतिमा झाकोळली जायची. ठाणे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात गाव तेथे शाखा सुरू करण्यात आनंद दिघे यांचा सिंहाचा वाटा होता. ग्रामीण भागातील शिवसैनिकांमध्ये आताही दिघे यांच्याविषयी वेगळीच आत्मियता आहे. दिघे यांचा शिष्य म्हणून आताही अनेक जुने वृध्दत्वाकडे झुकलेले शिवसैनिक दिघे यांच्यासारखा कपाळी टिळा लावून आपला स्वाभिमानी बाणा टिकवून आहेत. यामधील बहुतांशी वर्ग हा शिवसेनाप्रमुखांवरील निष्ठेमुळे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी आहे.

हेही वाचा : “त्यांना सांगा, आपली मैत्री आता २० तारखेनंतरच”, भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी भर सभेत केली शिवसैनिकांची कानउघाडणी

दिघे यांना मानणारी एक जुनी निष्ठावंतांची फळी शहरी, ग्रामीण भागात आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना या निष्ठावंत फळीचे मोलाचे सहकार्य व्हावे या विचारातून महायुतीच्या नेत्यांनी आनंद दिघे यांची देखणी प्रतिमा महायुतीच्या प्रसिध्दपत्रकावर झळकावून जुन्या निष्ठावंत शिवसैनिकांना साद घालण्याचा प्रयत्न केला आहे.

जिल्ह्यातील शिवसैनिकाच्या घरी कोणताही कार्यक्रम असला तरी वेळात वेळ काढून रात्रीअपरात्री जिल्हाप्रमुख आनंद दिघे तेथे हजेरी लावायचे. दिघे यांच्या तळमळीमुळे ठाणे जिल्ह्याच्या शहरी, ग्रामीण भागातील शिवसैनिक आताही आपल्या हदयात त्यांचे स्थान टिकवून आहेत. दिघे यांच्या या ताकदीचा विधानसभा निवडणुकीत लाभ उठवावा या विचारातून त्यांची प्रतिमा महायुतीच्या प्रसिध्दपत्रकावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या बाजुला झळकविण्यात आली आहे.

हेही वाचा : दिवा रेल्वे फाटकातील वाहन कोंडीमुळे  लोकल, एक्सप्रेस खोळंबल्या; शिळफाटा वाहन कोंडीत

गेल्या काही महिन्यापूर्वी आनंद दिघे यांच्या मृत्युचे प्रकरण उकरून काढून यावरून ठाकरे आणि शिंदे शिवसेनेत जोरदार शाब्दिक वाद रंगला होता. त्यामुळेही आनंद दिघे यांंना या निवडणुकीत वरचे स्थान देण्यात आल्याची चर्चा आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In dombivli anand dighe s image used by mahayuti in campaign css