डोंबिवली: कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील शाळा, महाविद्यालय परिसरातील अनेक पान टपऱ्यांंवर प्रतिबंधित गुटखा, गांजा, अफू, नशा येईल अशा वस्तू विकणाऱ्या विक्रेत्यांवर पालिकेने गेल्या आठवड्यापासून कारवाई सुरू केली आहे. अशाच प्रतिबंधित वस्तू विकणाऱ्या, तसेच हुक्का पार्लर चालवून नागरिकांच्या आरोग्यास, मालमत्तेस हानीकारक ठरणाऱ्या दोन विक्रेते, चालकांवर विष्णुनगर, कोन पोलिसांंनी गुन्हे दाखल केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डोंबिवली पश्चिमेतील पंडित दिनदयाळ रस्त्यावरील स्वामी विवेकानंद शाळेच्या समोर पानटक्का नावाने संदीप रामलखन कुमार (२०) हा पान,सिगारेट, तंबाखू विक्रीचे दुकान चालवितो. या दुकानात सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत तरूणांसह विविध वयोगटातील नागरिकांची गर्दी असते. या गर्दीचे रहस्य अनेक नागरिकांना उलगडत नव्हते. केवळ पान खाण्यासाठी एवढी गर्दी जमू कशी शकते, असा नागरिकांचा प्रश्न होता.

हेही वाचा : घोडबंदरचा ‘आरएमसी’ प्रकल्प बंद करण्यासाठी रहिवाशांची एकजूट; आंदोलनात पर्यावरणवादी सहभागी

गेल्या आठवड्यात ह प्रभागाचे साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांनी पानटक्का दुकानावर अचानक छापा टाकला. त्यावेळी दुकानात अधिक प्रमाणात प्रतिबंधिक गुटख्याचा साठा, चाॅकलेटच्या वेष्टनात नशा येणारी भुकटी पावडर आणि आरोग्याला हानीकारक नशेच्या वस्तू आढळून आल्या.

मानवी जीवनास या सर्व वस्तू हानीकारक आहेत हे माहिती असुनही या वस्तू पानटक्का दुकानात ठेवल्याबद्दल साहाय्यक आयुक्त सावंत यांच्या आदेशावरून अधीक्षक अरूण पाटील यांनी पानटक्का दुकानाचे मालक संदीप कुमार याच्यावर भारतीय दंड विधान सिगारेट, तंबाखू उत्पादने, पुरवठा आणि वितरण कायद्याने विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला आहे.

पानटक्का दुकानातील ग्राहक रस्त्यावर उभे राहत असल्याने शाळेत येणाऱ्या पालकांना विशेषता महिला वर्गाला सर्वाधिक त्रासदायक होती. अशाचप्रकारची गर्दी डोंबिवली एमआयडीसीत एम्स रुग्णालयासमोरील गल्लीत सकाळपासून रात्री उशिरापर्यंत असते. या भागात पोलिसांनी गस्त वाढविण्याची मागणी होत आहे.

हेही वाचा : मुंबई-नाशिक महामार्गावरील शहापूरजवळील कोंडीमुळे निवृत्त मुख्य सचिव, जिल्हाधिकाऱ्यांचा लोकलने प्रवास

हुक्का पार्लर गुन्हा

भिवंडी तालुक्यातील कोन गावात हुक्का पार्लर चालविणाऱ्या एका चालकासह त्याचे तीन कर्मचारी आणि पाच ग्राहकांविरुध्द कोन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोन गाव हद्दीतील स्ली रुप टाॅप लाॅन्ज हाॅटेल, तिसरा माळा टोयाटो शोरुमच्या वर, कोनगाव, ता.भिवंडी येथे आरोपी धीरेन महेश साधवानी हा आपल्या तीन कर्मचाऱ्यांंसह हुक्का पार्लर चालवित असल्याची माहिती कोन पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी या हुक्का पार्लरवर छापा टाकला. तेथे त्यांना तंबाखूजन्य हुक्का चालक वाधवानी ग्राहकांना पुरवित असल्याचे आढळले. तसेच तेथील कर्मचारी हातात एका झाऱ्यामध्ये विस्तव घेऊन तो झारा ग्राहकांच्या समोर नेऊन त्यांंना हुुक्का सेवन करण्यासाठी साहाय्य करत होते. यावेळी झाऱ्यातील ठिणग्या दुकानात उडून दुकातील फर्निचरला आग लागून मानवी जीवित धोक्यात येण्याची शक्यता होती. त्यामळे कोन पोलीस ठाण्याचे हवालदार गणेश सोनावणे यांनी हुक्का पार्लर मालक धीरेन साधवानी, नोकर सुमीत राजपूत, नसीम अली, वियनकुमार प्रजापती, गौरव रेडिज, अविनाश ठमके, संदीप काकळे, अमीत गुरव, रवी डागत यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In dombivli and bhiwandi police case registered against owners of hookah parlours and gutkha sellers css
Show comments